सोलापूर- Global Award Winner Teacher Resigns : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक देशातील पहिले ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले (Ranajitsinh Disale) गुरुजी यांनी आपला शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा ७ जुलै रोजीच दिलेला होता. राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे देण्यात आला आहे.
ग्लोबल टिचर अवार्ड २०२० मिळाल्यानंतर रणजितसिंह डिसले हे महाराष्ट्र तसेच देशभर माहिती झाले होते. अवार्ड मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पीएचडी मिळवण्यासाठी काही काळासाठी रजा मागितली होती मात्र, काही कारणांमुळे त्यांना रजा मिळाली नाही. पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील तीन महिन्यांत राजीनामा मागे घेण्यासाठी मुदत असते. त्यामुळं त्यांचा राजीनामा मंजूर होईल की, नाही याकडे लागलेलं आहे. त्याचबरोबर राजीनामा देण्याइतके मोठे पाऊल उचलण्यामागे काय कारण असेल हेही बघणे महत्वाचे ठरणार आहे.
डिसले यांना ग्लोबल पुरस्कार मिळण्यापूर्वी सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डायट) नियुक्ती करण्यात आली होती. त्यामाध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांना तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्यात येणार होतं. मात्र त्या दोन वर्षांच्या काळात डिसले संस्थेत उपस्थित नव्हते. त्या काळात त्यांनी ग्लोबल टिचर अवार्ड मिळवण्याच्या तयारीसाठी वेळ घातला असल्याची तक्रार सोलापूरच्या शिक्षण विभागात दाखल झाली होती. त्यासंबंधित चौकशी अजून सुरु आहे.