मुंबई | MC Stan – एमसी स्टॅन (MC Stan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून एमसी स्टॅन आणि अब्दु रोझिकचं (Abdu Rozik) भांडण चर्चेचा विषय ठरला आहे. अब्दुसोबत झालेल्या वादामुळे स्टॅनला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. अशातच आता या वादामुळे स्टॅनचे जवळचे मित्र, पुण्याचे गोल्डन बाॅइज (Golden Boys) स्टॅनवर संतापले आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गोल्डन बाॅइज म्हणून प्रसिद्ध असलेले सनी नाना वाघचौरे आणि संजय गुजर यांनी एमसी स्टॅनवर संताप व्यक्त केला आहे. सनी म्हणाला की, “स्टॅनचं वागणं वेगळंच आहे. त्याला आता गर्व आलाय. पण प्रसिद्धी आज असणार उद्या असणार की नाही हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे लोकांवर प्रेम करणं गरजेचं आहे, हा आमचा संदेश त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण तुझी लोकं तुझ्यासोबत कायम असणार आहेत आणि ती कायम तुझ्या पाठी उभी राहत होती त्यामुळे त्यांना विसरू नको.”
“कारण यामुळे आयुष्यात खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. आम्ही त्याला मोठा भाऊ या नात्यानं समजावत आहोत. जरी स्टॅनला या गोष्टीचं वाईट वाटलं तरी काहीही हरकत नाही”, असंही गोल्डन बाॅइज म्हणाले. सध्या त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.