नवी दिल्ली : २०२० मध्ये सरकारने रेशन कार्ड डिजिटल करण्याची योजनेची घोषणा केली होती . त्यानंतर त्या प्रक्रियेला सुरुवात देखील झाली होती परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता या योजनेला गती आली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने जुलै २०२२ पर्यंत रेशनकार्ड डिजिटल होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
तसंच आता सरकारने केलेल्या या डिजिटल रेशनकार्ड योजनेमुळे जनतेला सरकारकडून दर महिन्याला मिळणाऱ्या रेशनसाठी लांबच- लांब रांगा लावायची गरज पडणार नाही. याचबरोबर ही योजना सर्वांच्या फायद्याची देखील असणार आहे. प्रत्येकाला डिजिटल रेशन कार्ड वितरित केलं जाणार आहे. यामध्ये मे २०२२ पर्यंत 12 लाख 58 हजार 544 रेशन कार्डधारकांना डिजिटल रेशन कार्ड वितरित करण्यात आलं आहे.
दरम्यान, नागरिकांना आता एटीएममधून पैसे काढतो त्याचप्रमाणे पात्र लोकांनाही धान्य घेता येणार असल्याची माहिती राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री रेखा आर्य यांनी दिली आहे. तसंच अजूनही या योजनेवर काम करत असल्याचं देखील यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर पायलट प्रोजेक्ट देखील काही जिल्ह्यांमध्ये सुरू करणार असल्याचं रेखा आर्य यांनी म्हटलं आहे.