मुंबई : पोलिस सेवेत दाखल होण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या तरूणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र पोलिस दलात लवकरच ७ हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यात पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात ७ हजार पोलिस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील ४१६ पदं तातडीनं भरण्यास गृह विभागानं मान्यता दिली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिस अधीक्षकांना ही रिक्त पदं भरण्याबाबतचं आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार दीडशे पोलीस शिपाई, १६१ पोलीस शिपाई चालक आणि १०५ सशस्त्र पोलिसांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळं पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.