पुणे : खासगी कंपनी, कार्यालये तसेच शासकीय कार्यालयात काम करणार्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या बडीकॉप योजनेच्या कामकाजावर करोना संसर्गामुळे परिणाम झाला होता. गेले दोन वर्ष बडीकॉप योजनेतील प्रणाली बंद होती. संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा बडीकॉप योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. एखाद्या महिलेने मदत मागितल्यास तिला त्वरित मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.
बडीकॉप योजना काय?
नोकरदार महिलांच्या सुरक्षेस या योजनेअंतर्गत सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलेशी एखाद्याने गैरवर्तन केल्याची तक्रार आल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे कामकाज सुरू राहणार आहे. शासकीय कार्यालये, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या तसेच खासगी कंपन्यांतील महिला कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी या परिसरात नियमित गस्त घालण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर नोकरदार महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी समाजमाध्यमावर एक समूह तयार करण्यात येणार आहे. या समूहात संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय, खासगी कंपनीतील कर्मचारी महिलांचा समावेश करण्यात येणार आहे.
गृहिणी तसेच नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे पोलिसांनी बडीकॉप योजना सुरू केली होती. या योजनेतील संगणकीय प्रणाली तसेच व्यवस्थाही जवळपास बंद पडली होती. आता मात्र महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना समाजमाध्यमावर बडीकॉप नावाने समूह सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.