ससूनसाठी सरकारचा खर्च गेला पाण्यात

रुग्णालयाच्या खिडक्या, दरवाजांचे वाजले तीन तेरा

– सोमनाथ साळुंके

येरवडा : ससून रुग्णालयांमधील खिडक्या व दरवाजा हे फुटलेल्या व तुटलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे तीन तेरा वाजले असल्याचे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली असून, राज्य सरकारने रुग्णालयाच्या सुधारणेसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याचे सद्य:स्थितीवरून स्पष्ट होत आहे.

ससून रुग्णालयाची १० ते १५ वर्षांपूर्वी अतिशय बिकट अवस्था झाल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना विविध समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत होती. त्यामुळे येथील कामासाठी व नवीन इमारतीच्या बांधकामासाठी दोन्ही काँग्रेस सरकारच्या काळात अंदाजे तीस लाखांचे बजेट मंजूर केले होते. त्या वेळेस जुन्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस नवीन दगडी इमारतीचे बांधकाम करून जुन्या इमारतीमध्येही रखडलेली विविध कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यात आल्याने रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांनी झालेल्या कामामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला होता. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना जाणवणार नाही, याचा दावा अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत होता. मात्र त्यांनी केलेला दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. कारण तळमजल्यावर सोनोग्राफीसह गरोदर व बाळंत महिलांचा वाॅर्ड आहे. पण या वाॅर्डालगतच मागील बाजूस जाण्यासाठी लाकडी दरवाजा बसविण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत दरवाजाची अतिशय दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. कारण बसविण्यात आलेला दरवाजा पूर्णतः तुटलेल्या अवस्थेत असून, त्याच्या काचाही फुटलेल्या अवस्थेत आहे.

काचा पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेत असल्याने बाळंत महिला व त्यांच्या बालकास धोका निर्माण होऊ शकतो. कारण दरवाजाचा कडी-कोयंडा तुटल्यामुळे त्यास दोरीने बांधण्यात आले. मागील बाजूस पूर्णपणे मोकळी जागा असून रात्रीच्या सुमारास या भागाकडे कोणीही फिरकत नाही. रात्रीच्या सुमारास संबंधित दरवाजा तोडून अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोकळ्या जागेचा गैरवापर करून रुग्णालय प्रशासनाने कोणतीही दखल न घेता परिसरात राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकल्याने एखाद्या दिवशी अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ससून रुग्णालय प्रशासन रुग्णांची दखल घेण्यास किती सक्षम आहे, याचे चित्रच सध्या तरी स्पष्ट होत आहे.

पावसाचे पाणी अथवा थंडीपासून सुरक्षा व्हावी. याकरिता इमारतीच्या विविध मजल्यांवर खिडक्या बसवून त्यास काचा बसविण्यात आल्या आहेत; मात्र त्याही तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे रुग्णांची सुरक्षा रामभरोसे राहिली असल्याचे म्हणण्याची वेळ येणाऱ्या नागरिकांवर आली आहे. निकृष्ट दर्जाची रुग्णालयाची कामे केली, की काय, अशी शंका यामुळे उपस्थित होत आहे. रुग्णालयात अशा प्रकारचा भोंगळ कारभार सुरू असेल असे स्वप्नातही कोणास वाटत नसेल, पण ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा केलेला खर्च पाण्यात गेला असल्याचे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची, तसेच तुटलेला दरवाजा व खिडक्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

Sumitra nalawade: