सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरणात सत्ता परिवर्तन होणार की काय अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. एकीकडं पक्षाचे वरिष्ठ नेते पराभवाच्या कारणांवर विचारमंथन करत आहेत, तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदार संपर्कात नसल्यामुळे राजकारणात खळबळ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
तसंच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, लवकरच महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. याची सुरुवात गेल्या राज्यसभा निवडणुकीपासूनच सुरु झाली आहे. जेव्हापासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून तीन पक्षांच्या सरकारमध्ये एकमत दिसत नव्हतं अनेक आमदार नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतं होतं. यामुळे हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. योग्य निरोजन सुरु असून लवकरच सत्तेत परिवर्तन बघायला मिळेल असं शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.
दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी माझं म्हणणं जास्तच मनाला लावून घेतलं होत. राज्यसभा निवडणुकीपूर्वी संभाजीराजेंची गेम झाली इतकंच मी म्हटलं होतं. त्यावेळी मी कोणत्याच व्यक्तीच किंवा पक्षाचं नाव घेतलं नव्हतं तरीदेखील त्यांनी ते जास्तच मनावर घेतलं असं शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटलं आहे.