निश कवी फेडेरिको गार्सिया लॉर्का याने ‘साहित्यातील सहोदर’ अशी एक संकल्पना खूप वर्षांपूर्वी मांडून ठेवली आहे. एकाच मुशीतून तयार होणारे एकाच काळातील अथवा विभिन्न काळातील लोक विचारांच्या अथवा विचारप्रणालीच्या एकाच धाग्याने गुंतले जातात आणि वाचणार्याला अशा व्यक्तींच्या लेखनात एकत्वाचा अनुभव येत राहतो, अशी साधारण ही संकल्पना आहे.
म्हणजे एखाद्या घरात एखाद्या मुलाचा जन्म झाला, तर अगदी सहजपणे जसे लोक म्हणतात की, ‘अरे हा तर आजोबांचा तोंडवळा घेऊन आला आहे…’ अगदी तसंच, म्हणजे गुणसूत्रातून व्यक्तीची जशी ओळख ठरते, तशी साहित्यिक अथवा सृजनाच्या पातळीवर ज्यांची गुणसूत्रे जमतात, अशा लेखकांचे लेखन म्हणजे ‘सहोदर’ संकल्पनेचे मूळ होय. जसे वाल्मीकींनी रामायण लिहिले आणि ग. दि. माडगूळकरांनी गीतरामायण लिहिले, त्यांना आपण ‘आधुनिक वाल्मीकी’ म्हणतो, तसं काहीसं सहोदर हे प्रकरण आहे.
प्रवाहापेक्षा निराळं लिहिणारे आणि तरीही वाचकांमध्ये लोकप्रिय ठरलेले मराठीमधले तीन साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांनी आपल्या पुस्तकासाठी निवडले आहेत आणि ते म्हणजे आरती प्रभू अर्थात, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, जी. ए. अर्थात गुरुनाथ आबाजी कुलकर्णी आणि ग्रेस अर्थात माणिक सीताराम गोडघाटे. या तिघांची नावे एकत्रपणे वाचली आणि त्यांच्या साहित्यलेखनाची भूमी कशी आहे, हे ज्याला माहिती आहे, ते सहजच म्हणतील की होय; ‘सहोदर’ या संकल्पनेत हे तिघेही साहित्यिक सहजपणे एकजीव होतीलच. या तिघांपैकी जीए हे कानडी मुलखातले केवळ गद्य लिहिणारे; त्यांच्या साधारण २५६ कथांचे पाठबळ आणि पाच-सहा अनुवादित पुस्तकांचे भांडार, शिवाय पत्रलेखनाचे (मरणोत्तर) चार खंड अशी साहित्यसंपदा. खानोलकर म्हणजे मुळात कवी, पण ललितगद्य आणि नाट्यलेखनही तितकेच प्रभावी असलेले कोकणातले साहित्यिक. तर ग्रेस म्हणजे अस्सल वैदर्भी कवी आणि ललितलेखनकार. या प्रत्येकाचा स्वतंत्र वाचकवर्ग आणि प्रत्येक लेखकाचा हा वाचक इतका फिदा, की या आवडत्या लेखकांची पुस्तके स्वत:च्या संग्रही ठेवणारा.
अशा तीन विभिन्न प्रदेशातल्या आणि तीन भिन्न कालखंडातल्या साहित्यिकांच्या सृजनभूमीचा वेध घेण्याचे शिवधनुष्य माधवी वैद्य यांनी पेलले आहे. या तिघांच्याही साहित्याने झपाटून गेलेल्या माधवी वैद्य यांनी ‘सहोदर’ या नावानेच रंगमंचीय आविष्कारही सादर केलेला आहे आणि त्या आविष्काराच्या संहितेची सूत्रे या पुस्तकात आपल्याला आढळतात. आपल्या मनोगतामध्ये डॉ. माधवी वैद्य म्हणतात की, आरती प्रभूंनी म्हणून ठेवलेच आहे,
’गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे,
माझ्या पास आता कळ्या
आणि थोडी ओली पाने’
हीच भावना माझीही ह्या पुस्तकाचे मनोगत लिहितानाची आहे. सर्वप्रथम ह्या अलौकिक प्रतिभेच्या लेखकांना मनोमन दंडवत! त्यांच्या लेखनानेच मला हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या लेखनाचा आस्वाद घेताना त्यांचे शब्द माझ्या मनात एक अनोखा आनंद घेऊन आले. त्यांच्या साहित्याने मला निखळ साहित्यनिर्मिती म्हणजे काय चीज असते, त्याचे सतत दिग्दर्शन केले. त्यांचे साहित्य वाचताना कधी बकुळीचा सुगंध मनात दरवळला, कधी दारी देवचाफा डवरून आला, त्यांच्या प्रतिमांनी अंगणी प्राजक्तसडा घातला, कधी शब्दांच्या धुवांधार अनावर पाऊससरी
मनाने झेलल्या, कधी उदासीचे काळेकभिन्न ढग मनात दाटून आले, कधी शब्द नक्षत्रांच्या तेजाने मनात लकाकून गेले आणि माझे आयुष्य खूप समृद्ध केले. या तिघाही साहित्यिकांना ’अनन्वय’च्या व्यासपीठावरून ’सहोदर’ या कार्यक्रमात मी रसिकांसमोर मांडले. तो कार्यक्रम या पुस्तकाची बीज संकल्पना होती. या तिघांच्या ऋणांतून काकणभर मुक्त होण्याचा माझा लहानगा प्रयत्न म्हणजेच हे सहोदरचे लेखन. माधवी वैद्य यांनी इतक्या प्रांजळपणे आपले मनोगत लिहिले आहे की, वाचनाला सुरुवात करतानाच वाचक त्यांच्या भूमिकेशी सहमत होऊन जातो. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रा. डॉ. रुपाली शिंदे यांची ‘सहोदर’ला प्रस्तावना लाभली आहे.
त्यात त्या म्हणतात की, १९८० नंतरच्या म्हणजे आजच्या भाषेत बोलायचे तर ऐंशीच्या दशकात कवीच्या समग्र साहित्याचा सृजनोत्सव माधवीताई तरुणाईसह ’अनन्वय’ या त्यांच्या संस्थेतर्फे करीत आहेत. ज्या काळात ’डिजिटल क्रांती’चा नामोल्लेख नव्हता, कवितेचे अभिवाचन’ नव्हते, त्या काळात तरुण, उत्साही विद्यार्थ्यांना काव्यवाचनातून कवीच्या काव्याची वीण सजग जाणिवेतून उलगडून दाखविण्याचे काम माधवीताईंनी संहितालेखनामधून केलेले आहे. ग्रेस, जी. ए. या साहित्य अनुजांच्या निर्माणक्षमतेतून आणखी नवीन, अपूर्वाईची चीज निर्माण करण्याचा हा वेगळा प्रयत्न आहे. या तीन साहित्यिकांच्या साहित्यकृतींची चिकित्सा करणे, त्यांचे मूल्यमापन करणे ही ’सहोदर’ची निर्मितीरेखा नाही. आरती प्रभू-ग्रेस आणि जी. ए. यांच्या परस्परप्रभावी, परस्परप्रेरक, परस्परपोषक निर्मितीतत्त्वांचा शोध आणि वेध घेणे, ही ’सहोदर’ची लेखन प्रेरणा आहे.
पूर्ण झालेल्या साहित्यकृतीचे नव्याने अवलोकन करून नवा निर्मितीबंध प्रस्थापित करणे, ही ’सहोदर’ची बीजभूमी आहे. निर्मितीचा अनुबंध शोधणारी सृजनशील निर्मात्याची प्रेरकदृष्टी ’सहोदर’च्या मुळांशी जोडलेली आहे. लेखक-साहित्यकृती-कलावंताची दृष्टी लाभलेल्या अभ्यासक माधवीताई यांच्या दृष्टादृष्ट भेटीमधून ’सहोदर’ची निर्मिती झालेली आहे. म्हणूनच ’सहोदर’ हे नावही सृजनवेधातून घडलेल्या सृजनाशी लगटलेले भावस्पर्शी भावव्यंजक नाम आहे. या तीन साहित्यिकांच्या लेखन प्रकृतीचा, वाङ्मयीन व्यक्तित्वाचा समानधर्म शोधणे, हा सृजनवेध आहे. कवी, कवीचे भावविश्व, त्याने शब्दांकित केलेले त्याचे विचारधन आणि सातत्याने नव्याचा शोध घेत असताना त्याची झालेली फरफट ही वाचकाला त्या लेखनातून दिसून येत असते. या लेखनाचा वेध घेताना आस्वादक वाचकाला कधी स्तिमीत व्हायला होते, तर कधी चमत्कृतीपूर्ण कल्पनांनी तो गोंधळून जाण्याची शक्यता असते. हे व्हायचे नसेल, तर आस्वादक समीक्षेच्या जवळ जाणारी एक निराळी शैली विकसित करत माधवी वैद्य यांनी ग्रेस, जीए आणि आरती प्रभूंच्या साहित्यातील समविचारी स्थळे अलगदपणे उलगडून दाखवली आहेत.
एका अर्थाने, हे तीनही साहित्यिक कमी- अधिक प्रमाणात दुर्बोध मानले जातात. मात्र या दुर्बोधतेचा बाऊ न करता, अकारणच या दुर्बोधतेला न गोंजारता आणि दुर्बोधतेची प्रतिष्ठा वाढेल, असे काहीही न लिहिता माधवी वैद्य या दुर्बोधतेमागची कारणमीमांसा समजून घेतात आणि त्यांचे आकलन आपल्यापुढे असे काही ठेवतात, की वाचकाला वाचनानंद मिळतो. माधवी वैद्य यांच्या विद्यावाचस्पतीचा विषय खानोलकरांच्या साहित्याशी निगडित होता. त्यामुळे त्यांच्याबाबत लेखिका जे म्हणते ते आपल्याला सहज पटून जाते. त्या म्हणतात, खर्या कलावंताचे श्रेष्ठतेचे व जिवंतपणाचे लक्षण म्हणजे त्याला असणारे अपूर्णतेचे भान. खानोलकरांना ही जाण आपल्या प्रतिभेच्या अतिशय प्रगल्भ अवस्थेतही होती, म्हणूनच ’नक्षत्रांचे देणे’मध्ये ते म्हणतात, ’मी अजून शुद्ध नाही, बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा.’ हे भान फार थोड्या कलावंतांना असते. त्यापैकीच एक खानोलकर होते. आरती प्रभू कविता लिहिताना आपल्या भावनांशी प्रामाणिक राहिले.
प्रथम प्रथम जरी ही कविता अनुकरणात गुंतली असली, तरी नंतर तिने आपल्या स्वतंत्र वाटा चोखाळल्या. स्वतःचा असा स्वतंत्र ठसा उमटविला. जीवनविषयक मूलगामी चिंतन त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. त्यात विलक्षण अकृत्रिमता, साधेपणा आणि सहजता आहे. आरती प्रभू कोणत्याही वादाच्या प्रवाहापासून अलिप्तच राहून आपल्या काव्यानंदात मग्न राहिले. त्यांचे काव्य या मातीतली अभिजातता जपत उत्स्फूर्ततेने उमलत राहिले. खानोलकरांची प्रतिभा जेव्हा अधिक प्रगल्भ होऊन अभिव्यक्त होत होती जेव्हा त्यांचा कवी म्हणून कीर्तीचा दरवळ सर्वदूर पसरला होता. ग्रेसविषयी माधवी वैद्य म्हणतात की, ग्रेस यांच्या शब्दकळेचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांची शब्दरचना कमालीची ओढाळ आहे.
त्यांची कविता वाचताना वाचकाला असा प्रत्यय येतो, की वाचक त्या शब्दप्रवाहात पुढे पुढे जणू ओढाळपणे वाहत जातो. म्हणजे एखाद्या पाण्याच्या प्रवाहाला जशी ओढ असते, तशी काहीशी ओढ तो वाचक ते काव्य वाचताना अनुभवतो. कधीकधी या शब्दप्रवाहाची ओढ इतकी विलक्षण असते, की त्या वाचकाला थोडे थांबण्याची किंवा थोडी उसंत घेण्याची संधीसुद्धा कवी त्याला देत नाही. कवितेतील शब्द पारखावा, अर्थ जाणावा आणि शब्दांची नादमय आकृती होत असतानाच अर्थाची रेखीव आकृती तयार व्हावी, इतकाही अवधी आपल्याला मिळत नाही, अर्थासाठी थबकले की शब्द विरून जातात. एकूणच हे पुस्तक एकदा वाचून ठेवून देण्याचे नसून वारंवार वाचून आनंद घेण्याचे आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच.
श्रीनिवास वारुंजीकर