मुंबई : (Gram panchayat Election Date change) राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यात 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडणार होते, मात्र, आता यामध्ये बदल करुन 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, असे नवीन सुधारित परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलं आहे.
या पत्रकानुसार राज्यात सर्वत्र 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असं आयोगाने पत्रकात जाहिर केलं आहे.
ग्रामपंचायत निवडणुका कुठल्याच पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष स्थानिक पतळीवर आपापली ताकत पणाला लावणार आहेत.