“दोघांची इच्छा आहे, पण गुण जुळत नाहीयेत त्यामुळे आता…”; अजित पवारांच्या बंडाच्या चर्चेवर गुलाबराव पाटलांचं मिश्कील वक्तव्य

मुंबई | Gulabrao Patil – काल (18 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी स्वत: माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडत या चर्चांना पुर्णविराम लावला. दरम्यान, यासंदर्भात आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मिश्कील वक्तव्य केलं आहे.

गुलाबराव पाटील यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. पाटलांना माध्यमांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त खरंच आहे का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, मला वाटतंय की अजून तिथी जवळ आलेली नाही. गुण देखील जुळत नाहीयेत. त्यामुळे कोणती पुजा करावी हे एखाद्या ब्राह्मणाला विचारावं लागेल. पण वेळ नक्कीच येईल त्यामुळे काळजी करू नका.”

“दोघांची इच्छा आहे, पण गुण जुळत नाहीत असं ब्राह्मणाचं म्हणणं आहे. पण काळजी करू नका ही वेळ लवकरच येईल”, असं मिश्कील वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.

दरम्यान, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर अजित पवार यांनी काल स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, कारण नसताना माझ्याबाबत आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचं काम होत आहे. तुम्ही माझ्याबाबत ज्या बातम्या पसरवत आहात त्या सर्व गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही.

Sumitra nalawade: