“…म्हणून ‘धनुष्यबाण’ आमचाच आहे” बंडखोर गुलाबराव पाटलांचं मोठं विधान!

जळगाव : (Gulabrao Patil On Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बडखोरी केली त्यामुळं शिवसेनेत उभी फूट पडून मुळ शिवसेना आणि शिंदे गट असं विभाजन झालं आहे. त्यामुळं मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. एकंदरीत अशी स्थिती असताना शिवसेनेचे माजी मंत्री आणि बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही अद्याप शिवसेना सोडलेली नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच आहे, असं विधान त्यांनी केलं आहे.

दरम्यान माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटलांनी हे विधान केलं आहे. धनुष्यबाण कोणाचा आहे? न्यायालयात काय निर्णय होईल? असे प्रश्न विचारले असता, गुलाबराव पाटील म्हणाले, न्यायालयाच्या लढाईत आम्हाला फारसं बोलता येणार नाही. पण अशा स्थितीत कोणत्याही ठिकाणी सामान्यत: डोकी मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असतं. तसेच आम्ही अद्याप शिवसेना पक्ष सोडला नाही. त्यामुळे असा संभ्रम कुणी तयार करत असेल तर तो करू नये. आम्ही पार्टी सोडलेली नाही. आम्ही पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे.

मंत्रीमंडळ विस्तारवर प्रश्न विचारला असताना पाटील म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार कधी होईल? याचा कधी विचारच केला नाही. जो व्यक्ती मंत्रीपद सोडून आलाय, तो कशाला अशा गोष्टींचा विचार करेन? ८ मंत्र्यांनी राजीनामा देण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. लोकं सत्तेकडे जातात आम्ही सत्तेतून बाहेर पडलोय, मंत्रीपदं आमच्याकडे होती. लोकं साधं सरपंचपददेखील सोडत नाहीत. आम्ही कॅबिनेट मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद सोडलंय, याचाच अर्थ आम्हाला आमचा धनुष्यबाण वाचवायचा आहे.

Prakash Harale: