मुंबई : (Gulabrao Patil On Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी आमचं ऐकूनच घेतलं नाही त्यामुळेच आम्हाला दुसरा मार्ग पत्करावा लागला, तो आमच्यासाठी दुःखाचा क्षण होता अशी खंत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवली आहे. एवढंच नाही तर हा गुलाबराव काय साधा आहे का? या गुलाबासोबत काटेही आहेत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. माझ्यावर टीका करणाऱ्यांना टीका करू द्या असंही ते म्हणाले.
आज नवीन वर्ष असल्याने लोक विविध कार्यक्रमांना असल्याने, मी सकाळपासून माझ्या मतदारसंघात फिरतो आहे. नव्या वर्षाच्या निमित्ताने संकल्प हाच केला आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जे शिवसेनेचं वैभव होतं ते वैभव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला पुन्हा मिळवून द्यायचं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे स्वप्न आहे हर घर जल हर घर नल ते स्वप्नही पूर्ण करायचं आहे. २०२४ मध्ये मला लोक पाणीवाला बाबा म्हणूनच ओळखतील असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना गुलाबराव म्हणाले, “जे माझ्या विरोधात बोलत होते त्यांना आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत उत्तर दिलं आहे. ग्रामपंचायतीची बॉडी निवडून आली. आम्ही सिझनेबल पुढारी नाहीत, पाऊस आला की छत्री उघडली. आमचं दुकान दैनंदिन सुरू आहे. रोज आमची ओपीडी सुरू असते. तिथे हजारो लोकं समस्या घेऊन येतात”, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.