Oscar 2023 : यावर्षीच्या ऑस्करच्या स्पर्धेत तीन भारतीय चित्रपट होते. त्यापैकी दोन चित्रपटांनी पुरस्कार जिंकला आहे. साऊथचा ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्करमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला आहे आणि पुरस्कार जिंकला आहे. ‘सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग’ कॅटेगरीत हे नामांकन मिळाले होते. या चित्रपटाशिवाय ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. या शॉर्ट फिल्मने प्रॉडक्शनमध्ये पहिल्यांदाच भारतासाठी ऑस्कर जिंकला आहे. या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्या गुनीत मोंगा (Guneet Monga) आहेत. पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुनीत मोंगा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आजची रात्र ऐतिहासिक आहे कारण भारतीय निर्मितीसाठी हा पहिलाच ऑस्कर आहे. दोन महिलांसह भारताचा गौरव. धन्यवाद आई-बाबा, गुरुजी, माझे सह-निर्माता अचिन जैन, टीम सिख्या, नेटफ्लिक्स, अलोके, सराफिना, WME बॅश संजना. माझा लाडका नवरा सनी. ही कथा आणल्याबद्दल कार्तिकीचे धन्यवाद. जय हिंद!” असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.