प्रा. डॉ. सायली गणकर, कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, आंबी, तळेगाव दाभाडे |
आयुष्यात माणूस अनेक पडावांतून जातो. जीवनाच्या प्रत्येक पडावावर एक स्तर वर चढण्यासाठी कोणी ना कोणी आपले मार्गदर्शक ठरत असतात. आयुष्यात भेटणारा प्रत्येकजण आपल्याला चांगल्या, वाईट अनुभवाचे नकळत शिक्षण देत असतो. असा प्रत्येकजण एका अर्थी आपल्या गुरुस्थानी असतो. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर दिशा दाखवणाऱ्या या प्रत्येक गुरुरूपी व्यक्तीचा सन्मान करण्याचा दिवस असतो, तो म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा ! तिला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात.
भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमेच्या नावाने ओळखली जाते. या पौर्णिमेचा उल्लेख हा शिवपुराणामध्ये असल्यामुळे प्रथम आदीगुरु शंकराकडे बघितले जाते आणि त्यानंतर वेदव्यास, भगवान विष्णूंचे अंश अवतार यांना प्रथम गुरू म्हणून आपण मान दिलेला आहे. त्यांनी लिहिलेले वेद, पुराण, महाभारत हे सर्व आजवर आणि विश्वाच्या अंतापर्यंत आपल्याला आत्मिक समाधानासाठी सतत मार्गदर्शक आहेत.
गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो ती एक आदर आणि सन्मान व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणून. वेद व्यास यांच्यासहित सद्गुणी व्यक्तींची ज्यांनी आपल्याला आध्यात्मिक विकास व साधना यांची प्रगती आणि विस्तार सांगितला आहे. त्यांच्याप्रती या दिवशी आपण आदर व्यक्त करतो. या मार्गदर्शनाचा आपण आपल्या जीवनामध्ये समाधान आणि शांतीसाठी केलेला आत्मिक बदल, रोजच्या व्यवहारामध्ये त्याचा वापर त्या साठीची ही पौर्णिमा असते.
या सर्व गुरूंनी जगाच्या कल्याणाकरता अथक परिश्रम आणि तप केले. म्हणूनच वेदव्यासानंतर आपली प्रथम गुरू म्हणजे आई आपल्याला दिसते. त्यानंतर आजच्या या काळामध्ये आपण शिकतो, आपल्या शिक्षकांकडून जीवनाची अनेक मूल्ये शिकतो. त्यात जर या शिक्षकाला आपली भारतीय संस्कृती, मूल्य आणि आध्यात्मिक साधनेची बैठक असेल, तर विद्यार्थी हा उत्तम घडवला जातो. त्यामुळे वेदव्यासांपासून आलेले संपूर्ण ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याची उत्तम पद्धतीने सांगड ही फक्त आध्यात्मिक बैठक असलेल्या गुरूंकडून शिकणे हे महत्त्वाचे आहे.
आजच्या गुरुपौर्णिमेला आपण वेदव्यास, दत्तगुरू, ज्ञानेश्वर माऊली, रामकृष्ण परमहंस, आणि आई यांनी शिकविलेल्या मूल्यांचा आणि तत्त्व व तत्त्वज्ञानाचा आदर आणि सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.