गुरुशिष्य परंपरा, भारतीय संस्कृती जपायला हवी

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स |

प्राचीन काळात गुरू-शिष्य परंपरेला अपार महत्त्व होते. गुरुसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. आजच्या आधुनिक काळात ही गुरू-शिष्य परंपरा जपली पाहिजे. भारतात गुरू असणे हे मोठे सद्भाग्य समजले जाते. गुरूंचे वाक्य हे शिष्याला भ्रमातून बाहेर काढून अाध्यात्मिक मुक्ततेच्या प्रकाशात नेतात. गुरू परंपरेत गुरू हे परमात्मा आणि मनुष्य यांच्यात दुवा साधतात. ते भौतिक जगातून स्वर्गीय जगात नेतात. हिंदू परंपरेत गुरूला सूर्याची आणि शिष्याला चंद्राची उपमा दिली जाते. ज्याप्रमाणे चंद्र सूर्याकडून मिळालेल्या प्रकाशाने चमकतो. तसेच शिष्य आपल्या गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाने चमकू शकतात. 

मी सूर्यदत्त ही शिक्षण संस्था चालवत असताना माझ्या संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी गुरुपौर्णिमेनिमित्त मला भेटायला येतात, त्यावेळी मन खरोखर सुखावते. ‘सूर्यदत्त’ हे मूल्याधिष्ठित शिक्षण देणारी संस्था आहे. मुले हल्लीच्या काळाला अनुसरून का असेना, पण भेट कार्ड बनवून, मेसेज पाठवून, प्रत्यक्ष भेटून आपल्या गुरुप्रति आदर व्यक्त करताना बघून खूप समाधान वाटते. जे मूल्य आम्ही रुजवू पाहत आहोत ते मुलांपर्यंत पोहचेल याची ती पोचपावती असते. गुरूला आपण परमेश्वर मानतो. त्याच्याकडून मिळालेल्या ज्ञानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. जी आपण कायमच जपली पाहिजे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. 

माझ्या आयुष्यात मला गुरुचें मार्गदर्शन, प्रेम आणि कृपा खूप मिळाली आहे. त्यामुळेच मी आज येथवर पोहचू शकलो आहे. गुरूंचा आदर आणि गुरू शिष्यातील ज्ञानाच्या आदान प्रदानाची संवादात्मक प्रक्रिया अखंड चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न कायम असतो. म्हणूनच संस्थेत विद्यार्थ्यांच्या भेटीला, त्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून कायमच विविध क्षेत्रातील मान्यवर गुरूंना आम्ही निमंत्रित करतो. त्यांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आणत असतो. कारण संवादातूनच शिष्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. जर प्रश्न पडले तरच उत्तर मिळतील आणि पुढची वाट सापडेल या तत्त्वावर मुलांना देशाचे उज्ज्वल भवितव्य म्हणून घडविण्याचा प्रयत्न असतो. याचाच एक पैलू म्हणजे आम्ही रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, श्री श्री रवी शंकर, सद्गुरू, दादी जानकी अशा विविध क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तींना बोलावून त्यांना ‘द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त करतो.

मला आठवते मी लहान असताना माझे वडील बन्सीलाल चोरडिया प्रार्थना अगदी स्पष्ट उच्चारासह खड्या आवाजात म्हणत. जेणे करून आजूबाजूच्या लोकांच्याही कानावर त्याचे संस्कार व्हावे, वातावरणात शुद्धता आणि चैतन्य संचारावे. त्यांचा हेतू खूप शुद्ध आणि पवित्र असल्याने ते संस्कार माझ्यातही खूप खोलवर झाले आहेत. माझे वडील, आई रतनाबाई चोरडिया, मोहन धारिया यांच्यासह प्रीतिसुधाजी म. सा., मधुस्मिताजी म. सा. यांचे मार्गदर्शन व कृपा मला कायम मिळाली.

Dnyaneshwar: