“तुनिषाचा विश्वासघात केलेल्या शिझानला फाशी द्या”, रामदास आठवलेंची मागणी

मुंबई | Tunisha Sharma – 24 डिसेंबरला प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं (Tunisha Sharma) आत्महत्या करत जीवन संपवलं. तुनिषानं अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शिझान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. तसंच तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणावर सेलिब्रिटींप्रमाणेच राजकीय नेतेही व्यक्त होताना दिसत आहेत. यामध्ये नुकतंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी तुनिषाच्या कुटुंबियांची भेट घेतली असून यावेळी त्यांनी शिझानला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, “मी अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईची भेट घेतली. त्यांनी शिझान खानला (Sheezan Khan) कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तुनिषाचा विश्वासघात केलेल्या शिझानला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्याला फाशी दिली गेली पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मालिकेच्या सेटवर तुनिषानं गळफास घेत आत्महत्या केली होती. तुनिषा व तिचा बाॅयफ्रेंड शीझान खान ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत मुख्य भूमिकेत होते. ते गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, शीझाननं ब्रेकअप केल्यानं नैराश्यातून तुनिषानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आईनं केला आहे.

दरम्यान, तुनिषाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबियांसह मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या आईला अश्रू अनावर झाले होते. तसंच तुनिषाच्या काकांनी तिला मुखाग्नी दिली. यावेळी तिचे अनेक सहकलाकार आणि सिनेसृष्टीतील मित्रमंडळीही उपस्थित होती.

Sumitra nalawade:

View Comments (0)