मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हनुमान भगवान नही है, हनुमान एक जंगली वानर है’ असे वक्तव्य करणारे आम्हाला हनुमान चालीसाविषयी सांगतात असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला. यावेळी त्यांनी अयोध्येला जाणाऱ्यांनी आपल्या नेत्यांचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयीचे वक्तव्य काय आहे हे पण समजून घ्या, असंही म्हणत राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“बाळासाहेब ठाकरे यांची चिंता करण्याची गरज नाही. काही लोक या देशामध्ये दंगे घडवून विभाजन करण्याचा डाव करत आहेत. त्यांच्या विरोधात देखील शिवसेना लढत आहे. सन्मानीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान विरुद्ध केलेले उद्गार काय आहेत, हनुमान एक दलित व्यक्ती आहे. ‘हनुमान भगवान नही है, हनुमान एक जंगली वानर है’ असं वक्तव्य करणारे आम्हाला हनुमान चालीसाविषयी सांगतात.” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
“ज्या अयोध्येमध्ये चालले आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी आपल्या नेत्याचे वक्तव्य काय आहेत हे पण जरा समजून घ्या. ‘कोण हैं आदित्यनाथ, वो गंजा आदमी भगवे कपडे पहन के घुमता हैं पागल जैसा’ असं म्हणणारे अयोध्येला जात आहेत. आम्हाला बोलायला लावू नका. आता योगी त्यांचे कसे स्वागत करणार आम्ही पाहणार आहोत. योगी यांना गंजा, टकलू आदमी, भगवे कपडे खालून इकडे तिकडे फिरणारा असं बोलणाऱ्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही,” असंही राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “अश्विनी कुमार चौबे यांनी पुन्हा एकदा योगी चालीसा वाचायला पाहिजे. मला हनुमान माहित आहे. महाराष्ट्र हा राम आणि हनुमानाचा पूजक आहे.”