हार गई सजना…

घरातल्या कुडाच्या भिंतीच्या उभ्या सावल्यांचा ग्राफ तिच्यावर असणं हे सगळं ती कशी प्रेमात अडकली आहे, हे दाखवणारं. प्रकाश-सावलीचा अप्रतिम वापर गाण्यात केला आहे. पुन्हा पुन्हा पाहावा असा…

किशोर कुमार हा हरफनमौला कलाकार. गाणं, नाचणं, संगीत, दिग्दर्शन, स्वभावातलं मनमौजी रसायन. या गाण्याचा चित्रपट त्याच्या स्वभावाला साजेसा. नाव मनमौजी. या चित्रपटाची एक मजेदार आठवण. टॉलिवूडच्या स्टार अभिनेत्री जयललिता यांनी या चित्रपटापासून हिंदीत कारकिर्दीला सुरुवात केली. एक तीन मिनिटाचे नृत्य त्यांनी यात केलं. कृष्णाच्या रंगमंचावरच्या भूमिकेत. हा चित्रपट मूळ तेलुगू. डोंगा रामुडु. त्याचा हा रिमेक. हा चित्रपट, यातली सगळी गाणी खूप प्रसिद्ध झाली असे नाही. किशोरकुमार, साधना आणि प्राण यांच्या भूमिका. या चित्रपटात प्राण आणि साधना यांनी एक गमतीदार नृत्यही केलं आहे. पण मै तो तुम संग नैन मिलाके हार गयी सजना हे खूप सुंदर गाणं या चित्रपटातलं.

अनेकदा चित्रपटापेक्षा त्यातली गाणी खूप प्रसिद्ध होतात. यापैकीच एक हे एक गाणं. मदन मोहन आणि लता मंगेशकर हे रसायन पुन्हा एकदा श्रवणाचा आनंद द्विगुणित करतं. मदन मोहन यांच्याबद्दल मागच्या काही भागांत लिहिलं, पण त्यांचे संगीत बहरले ते लताच्या स्वरात. मदनभैया असं लतादीदी त्यांना म्हणायच्या. मदन मोहन आणि मुकेश यांच्याशी त्यांचे नाते वडील बंधूंचे होते. या दोघांबरोबर त्या गाणं म्हणताना एका कंफर्ट झोनमध्ये असायच्या. मदन मोहन यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी म्हटलेली गाणी आपल्याला आवडण्ााऱ्या पहिल्या दहा गाण्यांत असणारच यात शंका नाही. मनमौजी या चित्रपटाला मदन मोहन यांचं संगीत. लतांनी म्हटलेली गाणी. त्यातलं एक मै तो तुम संग… हे एक. राजेंद्रकृष्ण यांचे गीत. संवाद. राजेंद्रकृष्ण यांची अनेक गाणी काळजाची ठाव घेणारी. त्यातलं हे एक.

प्रेमभंगाचं दुःख. फसवले गेल्याची भावना. त्यातून निर्माण झालेली विरक्ती. या सगळ्याची जाणीव या गाण्यात. खरंतर प्रेमात हरणं, पराभूत होणं हे पण जिंकल्यासारखं असतं. पण इथं नायिका खरोखर पराभूत झाल्याचं म्हणते. नजरानजर झाली. आपुलकीची भावना निर्माण झाली. हृदयात प्राणप्रियाची स्थापना झाली. अढळ. कायमस्वरूपी. मात्र त्यानंतर त्याच्याकडून जी वागणूक मिळाली ती? तिनं स्वप्नभंग झाला. एखाद्या बेगडी, खोटं वागण्ााऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा. तो ही जन्मभराच्या वाटचालीसाठी. हे सगळं म्हणजे तुफान वादळात नंदादीप तेवत ठेवण्यातला प्रकार होता. स्वप्न दाखवली. त्यात फुलबाग होती. नाना रंगांची, गंधांची, फुलपाखरांची. पण स्वप्न संपलं.

जाग आली तेव्हा कळलं आपण वाळवंटात उभं आहोत. खरंतर त्याच्याशी नजरानजर न होती तरच बरं होतं. मनस्वास्थ्य न जाणं, हृदय विदीर्ण न होणं आणि हे सगळं न होण्यासाठी प्रेमात पडले नसते तर बरं झालं असतं. पण मी वेडी ना. त्यामुळे हे सगळं झालं. गाण्याबरोबर अप्रतिम दिग्दर्शन. हा एक या गाण्याचा पैलू. पिंजऱ्यातला पोपट. त्या पिंजऱ्याची सावली तिच्या चेहेऱ्यावर येते. तसंच घरातल्या कुडाच्या भिंतीच्या उभ्या सावल्यांचा ग्राफ तिच्यावर असणं हे सगळं ती कशी प्रेमात अडकली आहे, हे दाखवणारं. प्रकाश-सावलीचा अप्रतिम वापर गाण्यात केला आहे. पुन्हा पुन्हा पाहावा असा… …जरुरत है जरुरत है
सक्त जरुरत है!

मधुसूदन पतकी

Nilam: