मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर प्रचंड मोठा आर्थिक फटका बसलेल्या अदानी समुहाकडून गेल्या काही दिवसांमध्ये महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. अदानी समूहातील काही कंपन्यांची मुंबईत असलेली मुख्यालये ही गुजरातच्या अहमदाबाद येथे हलवण्यात आली आहेत. यामध्ये एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांची मुख्यालये गुजरातला गेल्याने आता अनेक महत्त्वाचे प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय तिथूनच घ्यायला सुरुवात झाली आहे. परंतु, कंपनीचे सीईओ अजय कपूर हे अद्याप मुंबईतच आहेत. यामुळे अंबुजा आणि ACC या कंपन्यांमध्ये दोन प्रशासकीय केंद्रे तयार झाली आहेत. परिणामी कंपन्यांचा कारभार सांभाळताना आणि निर्णय घेताना बराच गोंधळ उडताना दिसत आहे.
अदानी समूहाने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ६.५ अब्ज डॉलरला एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली होती. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. मात्र, हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर शेअर बाजारात झालेली पडझड आणि चौकशीच्या संभाव्य ससेमिऱ्यामुळे अदानी समूहान काही कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून गुजरातमध्ये नेली आहेत. कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती आहे. कामकाजासाठी त्यांना वारंवार मुंबई आणि अहमदाबाद अशा चकरा माराव्या लागत आहेत. या त्रासाला अनेक कर्मचारी कंटाळले आहेत.
अंबुजा आणि एसीसी या दोन्ही कंपन्यांचे मिळून १० हजार कर्मचारी मुंबईत कार्यरत आहेत. यामध्ये एसीसी कंपनातील ६ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ६० टक्के कर्मचारी हे व्यवस्थापन मनुष्यबळ आहे. तर उर्वरित ४० टक्के कर्मचारी हे फ्लोअर वर्कर्स आहेत. तर अंबुजा कंपनीतील ४७०० जण मुंबईत कार्यरत आहेत. यापैकी ७० टक्के कर्मचारी हे व्यवस्थापन वर्गवारीतील आहेत. मात्र, दोन्ही कंपन्यांची मुख्यालये गुजरातला हलवल्याने त्यांचे वरिष्ठ हे अहमदाबादच्या कार्यालयातून काम करत आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये स्थायिक होण्याचा पर्याय मान्य नसलेल्या मुंबईतील कर्मचाऱ्यांना गुजरातला खेटे मारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.