वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाडसाठी खेळाडूंना मदत

क्रीडामंत्री सुनील केदार यांचे मत : फ्रान्समधील नॉर्मंडी येथे होणार्‍या १९ व्या ‘आयएसएफ वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाड-२०२२’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी राज्याचे नाव उंचवावे. त्यासाठी खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशा शब्दांत क्रीडामंत्री सुनील केदार यांनी बुधवारी (दि.२०) संबंधित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

मुंबई : ‘आयएसएफ वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाड-२०२२’ या स्पर्धेसाठी निवड झालेल्या जिम्नॅस्टिकच्या खेळाडूंनी व त्यांच्या पालकांनी मुंबई येथे मंत्री केदार यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

भेट घेणार्‍यांमध्ये आर्यन दवंडे, मानस मनकवले, निशांत करंदीकर आणि सानिका अत्तरदे या चार खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेसाठी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पुणे येथे मार्च २०२२ मध्ये निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात वेगवेगळ्या राज्यांतून जिम्नॅस्टिकचे २१ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील आर्यन, मानस, निशांत व सानिका हे चार आणि सलोनी दादरकर हिच्यासह एकूण पाच खेळाडूंचा भारतीय संघात समावेश झाला आहे.

या स्पर्धेच्या इतर विविध क्रीडा प्रकारांत राज्यातील एकूण ३७ खेळाडूंची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू आता नॉर्मंडी येथे १४ ते २२ मे २०२२ या कालावधीत होणार्‍या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेत ७० देशांतील विविध क्रीडा प्रकारांत एकूण ३ हजार ५०० खेळाडू सहभाग घेणार आहेत. ठाणे येथील सरस्वती क्रीडा संकुलात वयाच्या चौथ्या वर्षापासून आर्यन व मानस आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिकचा सराव करीत आहेत. दोघांच्या पालकांची बेताची आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. त्यात प्रशिक्षक महेंद्र बाभूळकर यांचेही मोलाचे योगदान आहे. आर्यन दहावीत; तर मानस अकरावीत शिकत आहे.

या दोघांनी यापूर्वीदेखील विविध स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत. ठाणे महानगरपालिकेतर्फे गेल्या वर्षी त्यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.

Dnyaneshwar: