‘हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही तर…’; अभिनेता किच्चा सुदीपचं वक्तव्य चर्चेत

मुंबई : काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी विविध राज्यांतील लोकांनी परस्परांशी संपर्कासाठी इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हिंदी सक्तीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेला आला होता. हा एक प्रकारे हिंदी सक्तीचाच भाग असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. तसंच तमिळनाडू, तेलंगणा इत्यादी दाक्षिणात्य राज्यांमधील सत्ताधारी आणि राजकीय नेतृत्वाकडून शहा यांच्या या प्रस्तावाला विरोध केला जात आहे. नुकतंच दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याने यावर निशाणा साधला आहे. त्यासोबत त्याने दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरण्यावर देखील भाष्य केलं आहे.

नुकतंच किच्चा सुदीपने ‘R’-The Deadliest Gangster Ever या चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली. यावेळी त्याने दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, “दाक्षिणात्य दिग्दर्शक सध्या अशा चित्रपटांची निर्मिती करत आहे ज्याचे जागतिक स्तरावर अस्तित्व असेल. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक निर्माते हे तेलुगू आणि तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्याचे प्रमाण फार कमी आहे.”

“सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत”, असंही किच्चा सुदीप म्हणाला.

Sumitra nalawade: