हिंगोली | Bacchu Kadu – प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राज्य सरकार आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. आत्तापर्यंत राज्य सरकारची पाठाराखण करत आलेले बच्चू कडू आता सरकारवर आणि भाजपवर टीका करत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर बच्चू कडू लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काही धमाका करणार का? याबाबतच्या चर्चा आता रंगल्या आहेत.
हिंगोलीमध्ये प्रहार संघटनेनं दिव्यांग मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यामध्ये बच्चू कडू सहभागी झाले होते. तर यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, भाजप हा मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफझल खानासारखी मिठी मारतो, अशी खोचक टीका कडूंनी केली आहे. त्यांनी केलेल्या या टीकेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
आमच्यासोबत तुम्ही दगाफटका करू शकता पण लोकांसोबत नाही. मित्र पक्षांना भाजपनं समजून घेतलं पाहीजे. नाहीतर पक्षाची मूळ प्रतिमाच बेकार होईल. पक्षांना मित्र म्हणून जवळ घ्यायचं आणि नंतर अफझल खानासारखी मिठी मारायची हे योग्य नाही, अशी टीकाही बच्चू कडूंनी केली.