मैदान मारले…!

अत्यंत उत्तम व्यवस्थापन, संपर्क, कार्यकारणभाव लावण्याची हातोटी, यंत्रणांचा नेमका वापर, प्रशासनावर असलेली पकड, कायदा माहीत असण्याचा फायदा याबरोबरच अनुभव या सगळ्या जोरावर या निवडणुकीचे मैदान फडणवीसांनी मारले. विधान परिषदेच्या महत्त्वाच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय पटलावर आपण किंग असल्याचे दाखवून दिले आहे.

विधान परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाले. भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. पुरेशी मते नसतानाही भारतीय जनता पक्षाने आपले पाचही उमेदवार ज्या शिताफीने आणि कौशल्याने निवडून आणले, त्यांचे कौतुक करावे लागेल. विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे व्यूहरचना करून प्रसाद लाड यांना विजयी केले, ते पाहता महाराष्ट्राला अत्यंत धोरणी आणि राजकीयदृष्ट्या परिपक्व असा नेता मिळाला, हे स्पष्ट होत आहे. नव्वदच्या दशकामध्ये शरद पवार यांच्याबाबत महाराष्ट्रात अशीच ख्याती होती. शरद पवार दिल्लीत केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते.

ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परतणार होते, त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने आणि पत्रकाराने त्यांना दिल्लीतून पुन्हा महाराष्ट्रात जाऊ नका, असा सल्ला दिला होता, याचे कारण दिल्लीच्या राजकारणात राज्याचा आवाज केंद्रात ऐकला जाणारा आवाज हा शरद पवारांचा होता. शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्राचा आवाज निर्माण होण्यासाठी लागणारा कालावधी याचा विचार करता पवारांनी माघारी जाऊ नये, असे एक मत होते. त्यानंतर प्रमोद महाजन यांचा आवाज केंद्र सरकारमध्ये ऐकला जायचा, तो सर्व पक्षांना अडी-अडचणीला शरद पवार यांच्यासारखा मदतीला जाणारा होता. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा आवाज आणि स्थान निर्माण झाले असते, मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर ती जागा मोकळीच राहिली होती. आता ती देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने दिल्लीच्या राजकारणात जागा भरून निघेल.

देवेंद्र फडणवीस यांना यापुढच्या काळात मोठी संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषद यामध्ये जी खेळी केली. त्यात विरोधक चारीमुंड्या चीत झाले. खरेतर राज्यसभेच्या निवडणुकीत विधान परिषद आणि राज्यसभा यांचा संयुक्त प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना दिला होता. निवडणूक झाली नसती आणि मविआच्या सर्वच पक्षांची अब्रू झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती, मात्र राज्यसभेच्या वेळेस शिवसेनेने हट्टाची भूमिका घेतली आणि संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात ढकलले. दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपली क्षमता ताकद नसताना दुसरा उमेदवार उभा केला.

ताकद तर भाजपची पण नव्हती, मात्र भाजप रणनीतीमध्ये चोख तयारी करून उतरला, तर काँग्रेस मविआमधील आपल्या सहकार्‍यांच्या भरवशावर निवडणूक लढण्यास तयार झाले. राज्यसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जी चाल आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी खेळली ती चाल शिवसेना आणि राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या निवडणुकीत खेळली. आपल्या उमेदवारांना त्यांनी सुरक्षित केले आणि काँग्रेसला जय-पराजयाच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवले. भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या दोघांनाही अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या भवितव्याची चिंता होती. त्यात भाई जगताप थोडक्यात निसटले आणि नक्की निवडून येणारे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. राजकारणात कोणी कोणाचे नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांनी मतदान करण्याचा हक्क मिळावा, म्हणून आटोकाट प्रयत्न केले; मात्र या प्रयत्नातील फोलपणा त्यांनी लक्षात घेऊन शांत राहणे गरजेचे होते.

कदाचित आघाडीसाठी आपण प्रयत्न करीत आहोत, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. यादरम्यान भाजपच्या उमा खापरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर यांची ११ मते बाद झाली. अर्थात, याचा परिणामही अशा संवेदनशील वेळी जय-पराजयावर होऊ शकतो, परंतु हे दोघेही विजयी झाले. त्यातून रामराजे नाईक-निंबाळकर विजयी होणे राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. विधान परिषदेचे सभापती पराभूत होणे हे लाजिरवाणे तर होतेच, पण त्यानंतर पुन्हा एकदा या पदाची निवडणूक आणि निवडणुकीचे नाट्य यात ताकद घालवणे हे अवघड होते. त्यामुळे त्यांनी रामराजे यांना निवडून आणले. शिवसेनेनेही आदित्य ठाकरे यांना सचिन अहिर यांनी निवडून आणण्याकामी केलेल्या प्रयत्नांचा मोबदला विधान परिषदेचे आमदारपद देऊन फेडला.

एकूणच राजकीय पटलावर विधान परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय पटलावर आपण किंग असल्याचे दाखवून दिले आहे. अत्यंत उत्तम व्यवस्थापन, संपर्क, कार्यकारणभाव लावण्याची हातोटी, यंत्रणांचा नेमका वापर, प्रशासनावर असलेली पकड, कायदा माहीत असण्याचा फायदा याबरोबरच अनुभव या सगळ्या जोरावर त्यांनी या निवडणुकीचे मैदान मारले. काँग्रेसने मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेत आपल्या विचारांचा कोतेपणा दाखवला असला तरी राजकारण हे अत्यंत निष्ठूरपणे अमलात आणावे लागते, हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे.

Nilam: