मुंबई : (Home Minister Information Going To Surat Eknath Shinde) एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. शिंदेंनी रातोरात्र आमदार आणि मंत्री फोडले आणि नवा गटचं शिवसेना असल्याचा दावा केला. सुरतेनंतर भाजपशासित आसाम राज्यात शिंदेंच्या गटाला आश्रय देण्यात आलं आहे. यानंतर राज्यात नवं सरकार येणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.
मात्र, शिंदे आणि बंडखोर आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडाची तयारी करत असताना याची माहिती इंटेलिजन्सला पोहोचली नाही, याची शक्यता कमी आहे. रातोरात एकनाथ शिंदेसह अन्य मंत्री आणि आमदारांनी सरकारी सुरक्षा सोडली. महाराष्ट्राच्या सिमेवरच सर्वांनी सुरक्षा रक्षकांना माघारी पाठवलं. यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकारी काय करत होते, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे गृहखात्याला याची माहिती होती, असं समोर आलं आहे. आता संशयाची सुई वळसे पाटील यांच्याकडे गेल्याचं चित्र आहे.
दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या सुरक्षेस असलेल्या पोलिसांवर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे सुरतच्या दिशेने जात असल्याची माहिती चारही मंत्र्याच्या सुरक्षा रक्षकांनी वाॅकीटाॅकवर ‘कंट्रोल रूम’ला देण्यात आल्याचं समोर आलं आहे. शिंदे आपल्यासोबत पाच ते सहा आमदारांना घेऊन गुजरातला जात असल्याची माहिती गृहमंत्र्यांना होती, असं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या घडामोडीत पोलिसांचा दोष आढळून येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. या माहितीमुळे शरद पवार सेना नेते गृहमंत्र्यावर नाराज असल्याचं समजत आहे.