मुंबई : गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांवरून वातावरण चांगलंच तापलंय. यासंदर्भात सर्व पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट केल्या आहेत. काही पक्ष जातीय तेढ वाढवण्यासाठी राजकारण करत असल्याचेही आरोप केले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत सरकारला अल्टीमेटमही दिला आहे.
महाराष्ट्रातील तापलेलं वातावरण पाहता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “लाऊडस्पीकरला परवानगी असलेल्या डेसिबल मर्यादेत परवानगी द्यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणी त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.”
ते म्हणाले, “रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवू नयेत, असे न्यायालयाने सांगितले आहे. ज्या मशिदी किंवा मंदिरांनी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे, त्यामधील लाऊडस्पीकर काढण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेने कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये,” असंही ते म्हणाले.