काँग्रेसला आशा

विचारपूर्वक केलेले आक्रमण विरोधी पक्षापासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत व्यक्तीला घेऊन जाऊ शकते, हे नुकत्याच घडलेल्या घटनांच्या उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे.अशा वैचारिक आक्रमकतेसाठी आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसने मिळवले पाहिजे. भाजपलाही काँग्रेस पक्षच विरोधक म्हणून पाहिजे. प्रादेशिक पक्ष तोंडी लावायला पाहिजे असल्याने काँग्रेसला भवितव्य चांगले आहे. नाहीतरी आशेवर माणूस जगतोच की…!

धान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला पाहिजे. तशी मागणी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. एकादृष्टीने त्यांचे म्हणणे बरोबर आहे. विधानसभेची अडीच वर्षांची महाविकास आघाडीची कारकीर्द संपली. ठाक सरकार गेले आणि शिंदे सरकार आले. महाविकास आघाडीच्या ठाक सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपदासाठी काँगे्रसला अखेरपर्यंत आपला माणूस तिथे नेमता आला नाही.

नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून ते पद रिक्त होते. ते ३० जूनपर्यंत आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठराव मंजूर करतानाही उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना त्या खुर्चीवर बसून फैसला करावा लागला. यापूर्वी राष्ट्रसंचारच्या अग्रलेखात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसला कशा प्रका सत्तेच्या स्पर्धेत मागे ठेवत आहे, हे त्या त्या प्रसंगी लिहिले होते. शरद पवार यांच्या पसंतीचा अध्यक्ष जोपर्यंत काँग्रेस जाहीर करत नाही तोपर्यंत त्यांचा अध्यक्ष होणार नव्हता. ही वस्तूस्थिती होती आणि अखेरपर्यंत तसेच झाले. सर्वप्रथम अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले होते. मात्र राष्ट्रवादी आणि त्यांचे जमले नसते. खुद्द शरद पवार यांना चव्हाण अध्यक्षपदावर नको होते. एकेकाळी आघाडीच्या त्या दोघांच्या राज्यकारभारात पवार यांनी चव्हाण काम करीत नाहीत. त्यांच्या हाताला लकवा मारला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाण सर्वाधिक कार्यक्षम मंत्री असल्याचे दाखवून देण्यात आले होते.

एवढेच नव्हे, तर रात्रंदिवस काम करणार्‍या शरद पवार यांच्या कार्यकाळापेक्षा जास्त काम चव्हाण यांनी केले, हे दाखवण्याचे काम काँग्रेसने केले होते. त्यातूनही पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राच्या राजकारणात स्वतःला गुंतवून घेतले होते. त्यांना परत महाराष्ट्रात यायचे नव्हते. मात्र अशा वेळी त्यांना राष्ट्रवादीला चाप लावायला पुन्हा महाराष्ट्रात पाठवले आणि २०१४ पर्यंत त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतले नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला चांगला चाप लावला होता. सहकारी शिखर बँकेच्या संचालकांना बरखास्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या आणि बलस्थान असलेल्या सहकार क्षेत्राला सुरुंग लावला. आजही शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर चौकशीची तलावर कायम आहे आणि भारतीय जनता पक्ष त्याचा लाभ उठवत आहे. मात्र त्याचा प्रारंभ आणि मार्ग पृथ्वीराज चव्हाण यांनी आखून दिला, असेच म्हणावे लागेल. असे असताना शरद पवार यांना पृथ्वीराज चव्हाण विधानसभेच्या अध्यक्षस्थानावर नको होते. त्यानंतर संग्राम थोपटे यांच्या नावालाही त्यांची फारशी अनुकूलता नव्हती. अनंतराव थोपटे यांच्या तुफानी दौडीला ब्रेक लावायचे कारण शरद पवार हेच होते. कदाचित त्याचा हिशेब संग्राम थोपटे करू शकतात हा मुद्दा असू शकतो. मात्र अखेरपर्यंत काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले नाही आणि देशाच्या प्रगत, विकसित राज्यालाही अध्यक्ष मिळाला नाही.


काँग्रेसची ही जखम सत्तांतरानंतर पुन्हा एकदा ताजी झाली आहे. अध्यक्षपद नाही तर किमान विरोधी पक्षनेतेपद मिळावे, ही अपेक्षा असणे फारसे चुकीचे नाही. विधानसभेत अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले. एकेकाळी ते उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीही होते. राष्ट्रवादीचे क्रमांक एकचे पद कायम त्यांनी आपल्याकडे ठेवले. किमान विधान परिषदेत तरी विरोधी पक्षनेतेपद मिळावे, ही आता पटोले यांची अपेक्षा आहे. सभापतिपदी रामराजे नाईक निंबाळकर आहेत. ते राष्ट्रवादीचे. उपसभापतिपदी डॉ. नीलम गोर्‍हे या शिवसेनच्या. किमान विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर राजकारणाच्या परिघात राहता येईल. अन्यथा अगदीच राजकारणापासून अस्पर्शित राहणे काँग्रेसच्या नशिबी येईल. मुळात काँग्रेसला अडीच वर्षे मिळालेली सत्ता ही लॉटरी होती.

अन्यथा त्यांचा क्रमांक चौथा होता. सत्तेत येण्याची स्वप्ने ते दूरदूरपर्यंत पाहू शकत नव्हते. शरद पवार यांनी केलेल्या जोडकामामुळे काँग्रेसचा प्रवेश सत्तापरिघात झाला. त्यामुळे शरद पवार यांचा शब्द डावलायचा नाही. त्यांना नाराज करायचे नाही, असा विचार काँग्रेसमधल्या एका गटाचा होता. माणिकराव ठाक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला नाना पटोले यांचे राष्ट्रवादीवर टीका करणे मान्य नव्हते. सत्ता मिळाली ती टिकवण्यासाठी आणि सत्तेत आपण टिकण्यासाठी शरद पवार यांना सहन करण्याची त्यांची तयारी होती. मात्र नाना पटोले यांनी राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांशीही मुकाबला करण्याची तयारी ठेवली होती.

एका परीने नाना पटोले करीत होते ते योग्य होते. काँग्रेसला पुन्हा एकदा आपले वैभव मिळवायचे असेल तर आक्रमकपणा दाखवायला पाहिजे. तो दाखवण्याची हिंमत केवळ नाना पटोले करीत होते. पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाक यांची मानसिकता लढण्याची नाही, तर सांभाळून घेत लाभ मिळवण्याची आहे. मात्र आज ही मानसिकता ठेवून चालणार नाही. विचारपूर्वक केलेले आक्रमण विरोधी पक्षापासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत व्यक्तीला घेऊन जाऊ शकते, हे नुकत्याच घडलेल्या घटनांच्या उदाहराणांवरून स्पष्ट झाले आहे. अशा वैचारिक आक्रमकतेसाठी आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसने मिळवले पाहिजे. भाजपलाही काँग्रेस पक्षच विरोधक म्हणून पाहिजे. प्रादेशिक पक्ष तोंडी लावायला पाहिजे असल्याने काँग्रेसला भवितव्य चांगले आहे. नाहीतरी आशेवर माणूस जगतोच की…!

Sumitra nalawade: