पुणे : त्रिकोणी अथवा चौकोनी कुटुंबात ज्येष्ठ नागरिक अडगळ वाटू लागले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या स्थावर जंगम संपत्तीवर मुला-बाळांना वाटा हवा असतो, मात्र त्यांना सांभाळण्याची तयारी अजिबात नसते. अशात त्यांचे मानसिक व शारीरिक हाल होत असतात. परदेेशी मुलांना तर आपल्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही येण्यास वेळ नसतो. वृद्धाश्रम त्यांचे अंत्यसंस्कार करते. अशा परिस्थितीत आई-बापांनी आता मुलांवर भरवसा ठेवायचा कसा, हा प्रश्न निर्माण होत आहे.
ज्येष्ठांना असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी पोलिस आयुक्तालयात ‘भरोसा सेल’मध्ये स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पुण्यात एकटे राहणार्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना येणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी १०९० क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या समस्या हेल्पलाईनवर सांगतात, त्यांची प्रशासनाकडून तत्काळ दखल घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात.
नातेवाईकांकडून शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला जातो… मालमत्ता नावावर करून देण्यासाठी मुले त्रास देतात… आर्थिक कारणावरून सुनेकडून त्रास दिला जातो… अशा स्वरूपाच्या अशा तक्रारी ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे वाढत आहेत. जवळचेच नातेवाईक ज्येष्ठांना त्रास देत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या नऊ महिन्यांत ‘भरोसा सेल’ ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात पोलिस यशस्वी ठरल्यामुळे कक्षाकडे तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. आयुष्याचा हा शेवटचा टप्पा सुंदर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येणे फार गरजेचे आहे. ज्येष्ठांच्या समस्याही त्यांच्या वयानुसार आणि कौटुंबिक स्थितीनुसार वेगवेगळ्या असतात.
मुंबई, पुणे, बंगळुरू यांसारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सरत्या काळात वेगवेगळया छळणुकीला सामोरे जावे लागत आहे. हे दुर्दैव म्हणावेच लागत आहे. याच कारणाकरिता २००७ मध्ये ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा अस्तित्वात आणला गेला. कोणतेही मूल आपल्या पालकांना त्रास देऊ शकत नाही. तसेच कोणताही मुलगा-मुलगी आपल्या पालकांना त्यांच्याच घरातून हाकलून लावू शकत नाही. ज्येष्ठ नागरिकांना व आई-वडिलांना आपल्या मुलांकडील भरण-पोषण मिळवण्याचा अधिकार आहे. मुलाला जर स्वतःच्या घरात आई-वडिलांना ठेवायचे नसेल तर त्याला आपल्या पालकांना दरमहा गुजाराभत्ता, देखभाल खर्च द्यावा लागेल.
_अॅड. विद्या कुलकर्णी-वाळुंजकर (कायदेशीर सल्लागार)
मुळात ज्येष्ठ नागरिकांनी नव्या पिढीकडे मोकळेपणाने पाहिल्यास आणि तरुणांनीही त्यांना समजून घेतल्यास त्यांच्या आरोग्याच्या समस्यांची तीव्रताही कमी होईल, असे सांगण्यात येत आहे. पुण्यात एकटे राहणार्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. या ज्येष्ठ नागरिकांची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात किंवा इतर शहरांत राहायला आहेत. त्यामुळे ज्येष्ठांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्यात याव्यात; तसेच त्यांना सुरक्षित वाटावे, अशा सूचना प्रत्येक पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पोलिस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांची यादी करून, आठवड्याला भेटी देण्यास सांगितले आहे.
अशा तक्रारी टाळण्यासाठी मुलांनी अथवा सुनांनी त्यांची विचारपूस करावी. त्यांना मानसन्मान देण्यात यावा. त्यांनी या मुलांसाठी आयुष्य वेचलेले असते. त्यामुळे त्यांना असे वाटते की, आम्हाला अधिकार जरी नसला तरी आमची विचारपूस करून तरी मत विचारात घ्यावे. मुलांनीही त्यांची बाजूू समजून घेणे गरजेचे आहे. आजकाल मुलांना असे वाटते की, आई-वडिलांची संपत्ती हीच माझी संपत्ती आहे. असा सध्या दृष्टिकोन आहे, तर तो दृष्टिकोन मुलांनी बदलायला हवा. आई-वडिलांना वृद्धापकाळात मुले खर्या अर्थाने आधाराची काठी असते, याची नक्कीच जाणीव मुलांना व्हायला हवी. तरी मुलांनी त्यांचे योग्य पालनपोषण करावे.
_योगिता बोडखे, सहायक पो. नि.(ज्येष्ठ नागरिक कक्ष, भरोसा सेल)
याबरोबरच ज्येष्ठांना असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी पोलिस आयुक्तालयात ‘भरोसा सेल’मध्ये स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करण्यात आले आहे. या कक्षात सध्या १६५ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ८१ अर्ज प्रलंबित राहिले आहेत. सध्या पुणे शहरात भरोसा सेल ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून ६२१ ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुलांनी आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणे हेच हिताचे ठरणार आहे.
सध्या समाजात मोठ्या प्रमाणात अशा घटना घडताना दिसत आहेत. त्यावरून आई-वडिलांनी आपल्या संपत्तीचे विल (इच्छापत्र) करून घ्यावे. जेणेकरून भविष्यात या वयोवृद्धांना मुलांपासून अथवा सुनेपासून होणार्या त्रासातून सुटका होईल. जर असे नाही केले तर निश्चित याचा या वयोवृद्धांना त्रास होईल. आजकाल समाज खूप बदललेला आहे. मुले व सुनासुद्धा बदललेल्या आहेत. जरी एकुलता मुलगा असला तरी ती प्रॉपर्टी विल (इच्छापत्र) ने द्यावी. जेणेकरून भविष्यात वयोवृद्धांना त्रास होणार नाही. इच्छापत्राद्वारे आई-वडिलांच्या पश्चात ती संपत्ती खर्या अर्थाने मुलांच्या नावावर होते. जोपर्यंत आई-वडील हयात आहेत, तोपर्यंत त्या विल (इच्छापत्राचा) उपयोग होणार नाही. इच्छापत्र करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. यासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही. त्यामुळे इच्छापत्र करणे हेच खर्या अर्थाने सोयीस्कर ठरणार.
अॅड. नीता जोशी(कायदेशीर सल्लागार)
मुलांनी घराबाहेर काढल्यास?
- ज्येष्ठ नागरिक संरक्षण अधिनियम २००७ अंतर्गत पालक अशा वेळी कारवाईची मागणी करू शकतात.
- सी. आर. पी.सी. चे कलम १२५ अंतर्गत गुजारा भत्त्याची देखभालीची मागणी करू शकतात.
- मुलाने मारहाण केली अथवा धमकी दिली, तर पोलिसांतही तक्रार दाखल करू शकतात.
- पोलिसांनी तक्रार घेतली नाही, तर मॅजिस्ट्रेट अथवा फॅमिली कोर्टात अपील करू शकतात.
- मुलांनी फसवून घर आपल्या नावे केले तर ते मान्य होत नाही.
- पालकांनी याची तक्रार केली तर जिल्हा प्रशासन त्यांना परत कब्जा मिळवून देऊ शकते.
- कोर्टाच्या ऑर्डरनंतरही मुलाने आपल्या पालकांना गुजाराभत्ता दिला नाही, तर त्याला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
- श्वेता शेट्टीविरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि इतर रिट याचिका क्र. ९३७४/२०२० (एल) या केसमध्ये उच्च न्यायालयाने दिलासा देताना नमूद केले, की एकतर पालकांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलांना पालकांच्या हयातीमध्ये कुठलाही हक्क मिळत नाही. त्यामुळे वेळ पडल्यास मुलांना घराबाहेर काढण्याचा हक्क पालकांना आहे.