मेंदूला कशी सवय लावावी (भाग ३)

अशोक सोनवणे, सायकोलॉजिस्ट तथा ब्रेन प्रोग्रामिंग ट्रेनर

आपण आपल्या मेंदूला वारंवार जशा सूचना देऊ, तसा आपला मेंदू काम करीत असतो. मेंदूला चांगले-वाईट समजत नाही, जसे मेंदूमध्ये वारंवार विचार निर्माण होतील, तसेच मेंदू काम करीत असतो. मग आपण जर स्वतःला वारंवार सूचना दिल्या, तर त्याचा परिणाम मेंदूच्या कार्यपद्धतीवर होतो. स्वतःच्या विचाराला नियंत्रित करण्यासाठी, विचाराला योग्य दिशा देण्यासाठी स्वतःच्या मेंदूला आणि स्वतःला योग्य सवयी लावण्यासाठी सूचनांचा नियम प्रभावी उपयोगी पडतो.

सर्वसाधारण व्यक्ती एका दिवसाला किमान ६० हजार विचार करीत असतो. परंतु या विचारांपैकी फक्त सहा हजार विचार जागृत/बाह्यमनाकडून आपल्याला समजत असतात, तर ५४ हजार विचार मात्र अंतर्मनातून होत असतात. सहा हजार विचारांना नियंत्रित करून, ६०,००० विचाराला योग्य दिशा देऊ शकतो. त्यामुळे जागृत मनामध्ये आपण वारंवार कोणते विचार करतो, कोणत्या सूचना देतो हे अतिशय महत्त्वाचे असते.

उदा:- चांगले आरोग्य राहण्यासाठी मला दररोज मैदानात फिरायला गेलेच पाहिजे असा वारंवार विचार केला. मी उद्या मैदानात फिरायला जाणारच. अशा सूचना वारंवार स्वतःला दिल्या तर आपले जागृत मनातील विचार अजागृत मनामध्ये रुजले जातात. मग बरोबर वेळेचे नियोजन होते. सर्व गोष्टीचे व्यवस्थापन करून आपण मैदानात फिरायला जातोच. त्यामुळे आपल्याला जे हवं आहे. त्याचे वारंवार विचार केले की, वारंवार स्वतःला सूचना दिल्या की, त्यावर काम आपोआप होते. यातूनच मेंदूला सवय लागते. म्हणजेच असेच महत्त्वाचे विचार आपण लिहिण्यास, वारंवार विचार करण्यास सुरुवात केले की, तेच विचार पूर्ण करण्यासाठी अंतर्मनातील विचार पूर्ण होतात. हे मेंदूस्तरावर कसे होते ते पाहूया. जेव्हा आपल्याला सवयी लागतात तेव्हा त्या सर्व सवयी अंतर्मनातून नियंत्रित होत असतात. जेव्हा कोणतीही कृती प्रथम करतो तेव्हा दोन न्यूरॉन्स उजळून निघतात. पण त्याच कृती वारंवार होतात तेव्हा याच न्यूरॉन्सला अनेक फांद्या फुटतात. जेव्हा अधिक फांद्या फुटतात तेव्हा वरील नवीन १० % पालवी म्हणजेच बाह्यमन असते, तर याउलट ९० टक्क्यांखालील फांद्या व उपफांद्या हे अंतर्मन असते.

आपल्या व्यक्तिमत्त्वातील गुण-दोष किंवा आपल्या कुटुंबातील, मुलांमधील गुणदोष, व्यक्तीला लागलेल्या सवयी, आजचे आरोग्य, प्रभाव क्षेत्र, आर्थिक, सामाजिक प्रगती, सुख- दु:खं हे सर्व आपल्या बाह्य / जागृत मनातील विचारातून अंतर्मनात मेसेज जातात. मग अंतर्मनात न्यूरॉन्सच्या घट्ट जोडण्यातून त्याच त्या सूचना बाह्यमनाला दिल्या जातात. मग बाह्यमन अंतर्मनाच्या सूचनेनुसार काम करते. त्यामुळे आपण आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या जोडण्यातून मेंदूला कोणत्या सवयी लावतो हे भविष्यातील यशापयशासाठी अतिशय महत्त्वाचे असते.

Sumitra nalawade: