लक्षात ठेवून धोरण आखणे गरजेचे
हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार
भारतातल्या तांदळाचे देशांतर्गत भाव किमान हमीभावापेक्षा (एमएसपी) दहा टक्के कमी आहेत. त्यामुळे तांदळाबाबत गव्हासारखी स्थिती उद्भवणार नाही. बाजारातले तांदळाचे भाव भडकतील, अशी शक्यता आहे. खासकरून चीनमधून मागणी वाढल्यास भारतातल्या तांदळाच्या दरातही वाढ होऊ शकते.
तांदळासारखं पीक सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. देशात तांदळाचे भरपूर उत्पादन होते, तसेच त्याला भरपूर मागणीही दिसून येते. आपल्याकडे भाताला ‘पूर्णान्न समजले जाते. अनेकांच्या आहारात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असणार्या भाताच्या अनेक जाती महाराष्ट्रात पिकवल्या जातात. आंबेमोहोरपासून कोलम, चिन्नोर, उकडा, बासमती, जिसाळ, मोगरा यांसारख्या अनेक जाती पिकवल्या जातात… यंदा कसा असेल हा बाजार?
यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला होता. तरीदेखील प्रत्यक्षात मोसमी वार्यांनी देश व्यापण्यास आणि सक्रिय होण्यास बराच वेळ घेतला. त्यामुळे देशातल्या अनेक भागांनी ओढ अनुभवली. महाराष्ट्रातल्या अनेक भागांचा यात समावेश होता. राज्यातले काही जिल्हे कायमच कमी पाऊसकाळाने ग्रस्त असतात. ऐन पावसाळ्यात कोरड्याठाक पडलेल्या, भेगाळलेल्या जमिनी पाहण्याचे दुर्दैव या भागातल्या जनतेच्या नशिबी दिसते. पण पावसाने ओढ दिल्यास मुबलक पाण्यासाठी ओळखली जाणारी पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई यांसारखी मोठी शहरेही तहानेने व्याकूळ होतात. धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली, की शहरवासीयांच्या चिंतेत भर पडू लागते. पाऊस वेळेत न आल्यास शहरी नागरिकांना पिण्याच्या, तसेच वापराच्या पाण्याची तर शेतकरीवर्गाला पेरणीची चिंता भेडसावू लागते.
एकूणच भारतासारख्या कृषिप्रधान देशात पावसाचे चक्र थोडेफार बदलले तरी पिकांना मोठा फटका बसताना दिसतो. बहुसंख्य शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे तांदूळ, कडधान्ये, विविध प्रकारच्या भाज्या यांची लागवड लांबते. साहजिकच वेळेत पेरण्या न झाल्याचा फटका शेतकरीवर्गाला सोसावा लागतो. आगमन विलंबाने झाल्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतली तर उभे पीक करपून जाण्याची वेळ येते.
त्यामुळेच पावसाचे वेळापत्रक तांदूळ उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. गुडघाभर चिखलात उतरून भात लावला आणि पिकाची चांगली वाढ झाली, की केलेल्या कष्टाचे चीज होते. भातासारख्या मुख्य अन्नाची वर्षभराची सोय झाल्यामुळे एक प्रकारची निश्चिंती मिळते आणि आपल्या गरजा भागवून निर्यातीला उपलब्ध करून दिल्यास अर्थार्जनही उत्तम प्रका होण्याची खात्री लाभते. असे एक ना अनेक कंगो असल्यामुळे भातलावणीमध्ये पावसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. असे असताना यंदा आधी पावसाने ओढ देऊन काळजी वाढवली, पण नंतर विलंबाने जोरदार हजेरी लावून दिलासा दिला. आता सर्वत्र पाऊस सुरू आहे. जुलैचे उर्वरित दिवस आणि ऑगस्टमध्ये तुलनेने अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. तो खरा ठरण्याची शक्यता दिसत आहे. काही जणांनी तर सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडेल, असे भाकीत वर्तवले होते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे पाऊसपाणी चांगले असेल तर शेतकरी सुखावेल.
गेल्या दोन वर्षांमध्ये तांदूळ वगळता जगातल्या अन्नधान्याच्या किमती ६० टक्क्यांनी वाढल्या. गव्हाच्या तुलनेत तांदळाच्या व्यापारात भारत हा मोठा खेळाडू आहे. २०२१-२२ मध्ये जागतिक गव्हाच्या व्यापारात भारताचा वाटा साडेतीन टक्के असल्याची आकडेवारी अमेरिकेच्या कृषी खात्याने प्रसिद्ध केली. इतका अल्प हिस्सा असूनही यंदा भारताने गहूनिर्यात रोखताच तीव्र प्रतिक्रिया उमटली. असे असताना जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के इतका मोठा आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. २०२१-२२ मध्ये देशाने दोन कोटी १० लाख टन तांदळाची निर्यात केली. भारत दीडशे देशांमध्ये बासमतीव्यतिरिक्त इतर तांदूळ निर्यात करतो.
नेपाळ, मादागास्कर, केनिया, इंडोनेशिया असे अनेक अल्प आणि मध्यम उत्पन्न असणा देश भारतातून येणार्या स्वस्त तांदूळपुरवठ्यावर अवलंबून आहेत. एकीकडे असं असताना राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. व्ही. कृष्णा राव यांनी तांदळाच्या निर्यातीवर बंदी येण्याची शक्यता फेटाळून लावणे ही देशासाठी तसेच वर उल्लेख केलेल्या देशांसाठीही समाधानकारक बाब म्हणावी लागेल.
भारतातल्या तांदळाचे देशांतर्गत भाव किमान हमीभावापेक्षा (एमएसपी) दहा टक्के कमी आहेत. त्यामुळे तांदळाबाबत गव्हासारखी स्थिती उद्भवणार नाही. बाजारातले तांदळाचे भाव भडकतील, अशी शक्यता आहे. खासकरून चीनमधून मागणी वाढल्यास भारतातल्या तांदळाच्या दरातही वाढ होऊ शकते. म्हणून सरकारने शेतकरी, ग्राहक आणि निर्यातदार या सर्वांचे हित लक्षात ठेवून धोरण आखणे गरजेचे आहे.