मुंबई | Hruta Durgule Talk About Difference Between Serial And Movie Actors – मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ‘अनन्या’, ‘टाईमपास 3’ या दोन्ही चित्रपटांमुळे सध्या ती प्रसिद्धीझोतात आहे. तसंच नुकतंच हृता दुर्गुळेने झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने मोठ्या पडद्यावरील कलाकार छोट्या पडद्यावरील कलाकारांना कमी समजतात, अशी खंत व्यक्त केली आहे.
‘बस बाई बस’ हा कार्यक्रम लोकप्रिय ठरत असून सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता येत्या भागात अभिनेत्री हृता दुगुळे आणि तिच्या सासूबाई मुग्धा शाह या हजेरी लावणार आहेत. याचा एक प्रोमो नुकतंच समोर आला आहे. यावेळी अभिनेते सुबोध भावे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने ही खंत व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमात सुबोध भावे हृताला चित्रपटात काम करणारे कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात का? असा प्रश्न विचारतात. यावर उत्तर देताना ती हो असं म्हणते. त्यावर सुबोध भावेंनी काही क्षणात असे कोणते कलाकार आहेत, त्यांची नावं सांग असं विचारलं. त्यावर हृताने मी नाव सांगणार नाही, पण हे खरं आहे. सेटवर त्यांच्या वागण्या बोलण्यावरुन त्यांच्या वाइब्सवरुन कळतं, असं म्हटलं आहे.
त्यावर सुबोध भावेंनी म्हटलं की ते मोठ्या पडद्यावर दिसतात आणि तुम्ही छोट्या पडद्यावर म्हणून हा फरक आहे का? तर त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, मला का ते नेमकं माहिती नाही. पण सत्य परिस्थिती अशी आहे की मालिकेतील कलाकार हे फारच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. कारण ते दररोज घरी पोहोचतात.