ग्वाल्हेर | Bizarre Court Order – ‘दोन बायका फजिती ऐका’ हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. पण खऱ्या आयुष्यातही एका व्यक्तीला दोन बायका असतील तर त्याची फजिती नक्कीच होणार. असाच एक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीला दोन बायका असून तो एका पत्नीसोबत तीन दिवस राहणार तर दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहणार आहे. तसंच रविवारी त्याला सुट्टी असेल तर तो त्याच्या मर्जीप्रमाणे दोन्हीपैकी कोणत्याही पत्नीसोबत राहू शकतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना. पण ही कोणतीही स्टोरी नसून खरी घटना आहे.
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर (Gwalior) येथे एका नवऱ्याची वाटणी करण्यात आलेली आहे. एवढंच नाही तर या नवऱ्याचा पगारही वाटण्यात आला आहे. हा निर्णय मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर कुटुंब न्यायालयानं दिला आहे. सध्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
ग्वाल्हेर येथील एक व्यक्ती हरियाणा येथील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून चांगल्या पगारावर काम करतो. त्यांचं 2018 मध्ये लग्न झालं. त्यानंतर 2020 मध्ये कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागलं होतं. त्यावेळी तो व्यक्ती पत्नीला माहेरी सोडून कामासाठी हरियाणाला परत आला. त्यानंतर त्याचं ऑफिसमधील सहकारी महिलेसोबत प्रेम जुळलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑफिसमधील सहकारी महिलेसोबत त्या व्यक्तीचं सूत जुळलं. त्यानंतर तो ग्वाल्हेरला येत नव्हता. तो फक्त बायकोला खर्च पाठवत होता. त्यामुळे बायकोला नवऱ्यावर संशय आला. त्यानंतर तिनं शोध घेतल्यानंतर नवऱ्यानं दुसरं लग्न केल्याचं समोर आलं. त्या व्यक्तीनं हरियाणात ऑफिसमधील सहकारी महिलेसोबत दुसरं लग्न केलं होतं. त्यानंतर नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती पहिल्या पत्नीला मिळाल्यानंतर तिनं कोर्टात धाव घेतली. न्यायालयानं सुनावणीच्या वेळी नवरा आणि त्याच्या दोन्ही पत्नींमध्ये मध्यस्थी करून हे प्रकरण निकाली काढलं.