दाहोद : मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे असं स्पष्टीकरण गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी दिलं आहे. काँग्रेसच्यावतीनं दाहोद येथे आयोजित आदिवासी सत्याग्रह रॅलीमध्ये पटेल यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी हार्दिक पटेल म्हणाले, मी या कार्यक्रमाला का येणार नाही, मी काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष आहे. जेव्हा केंद्रीय नेतृत्व येईल तेव्हा मी निश्चितच इथं असणार. मी अजूनही काँग्रेस पक्षातचं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर राज्य नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करणार का? असं विचारलं असता पटेल यांनी तिरकस उत्तर दिलं. ते म्हणाले, “जेव्हा केंद्रीय नेतृत्व येथे असेल, तेव्हा ते निश्चितपणे राज्य नेतृत्वाशी बोलतील फक्त माझ्याशीच नाही. तसेच ते इतर गोष्टींवरही चर्चा करतील”.
दरम्यान, हार्दिक पटेल यांनी गेल्या महिन्यात आपल्या ट्विटर बायोमधून पक्षाचं नाव हटवलं होतं तसंच आपला फोटो बदलत भगवी शाल अंगावर घेतलेला नवा फोटोही लावला होता. यामुळं हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्ष सोडला असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.