सांगली : “गांधीजींनी श्वास सोडताना हे राम म्हटलंच नव्हतं असं गोडसेजींनी कोर्टात ट्रायल झाली तेव्हा स्पष्ट केलं होतं”, असं विधान अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलं. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. तसंच गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची मोठी फसवणूक केल्याचं देखील सदावर्ते म्हणाले होते. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुणरत्न सदावर्ते यांना सुनावलं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड बोलत होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख वेडा माणूस असा करत आव्हाडांनी टीका केली आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, “घृणा येते या सगळ्याची. किळस वाटते. गांधींनी या देशाला फसवलं असं एखादा वेडा माणूसच म्हणू शकतो. ज्या गांधींपुढे नेल्सन मंडेला, जगातले सगळे मोठे नेते नतमस्तक झाले, आजही होतात. या देशातले नेते विदेशात गेले की एकच नाव कानावर पडतं, ते म्हणजे महात्मा गांधी. त्या गांधींबद्दल असं बोलताना त्यांना काहीच वाटलं नसेल का?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.