‘मी बॅालिवूडचं नाव बदलून…’- नवाजुद्दीन सिद्दीकी

मुंबई : बॅालिवूड आभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं बॉलिवूडमधील टॉप कलाकारांच्या यादीमध्ये नाव आवर्जून घेतलं जातं. नवाजुद्दीनने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तसंच आपलं मत स्पष्टपणे मांडणं ही त्याची खासियत आहे. बॉलिवूडबाबत तसेच आपल्या चित्रपटांबाबत नवाजुद्दीन याआधीही खुलेपणाने बोलताना दिसला आहे. त्याचबरोबर आत्ताही त्याने बॅालिवूडबाबत खुलेपणानं भाष्य केलं आहे.

नवाजुद्दीननं ‘इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव्ह २०२२’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्याला बॉलिवूडबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. “बॉलिवूडमध्ये कोणते बदल घडले पाहिजेत असं तुला वाटतं?” हा प्रश्न नवाजुद्दीनला या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आला. यावर उत्तर देताना नवाजुद्दीन म्हणाला, “मी बॉलिवूडमधील तीन गोष्टी बदलू इच्छितो. प्रथम मी बॉलिवूडचं नाव बदलून हिंदी चित्रपटसृष्टी ठेवेन, दुसरं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या सेटवर रोमन लिपीमध्ये कलाकारांना स्क्रिप्ट दिली जाते. मी ती स्क्रिप्ट देवनागरी लिपीमध्ये मागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटांच्या सेटवर हिंदी भाषेमध्ये बोललं पाहिजे. चित्रपट हिंदी पण दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक देखील इंग्रजी भाषेतच बोलतात.”

या कार्यक्रमादरम्यान नवाजुद्दीनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची सर्वाधिक चांगली गोष्ट म्हणजे सगळेच तमिळ भाषेमध्ये एकमेकांशी संवाद साधतात. त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे. चित्रपटांचे दिग्दर्शक, लेखक, रंगभूषाकार सगळेच जण त्यांच्या भाषेमध्ये एकमेकांशी संवाद साधतात.”

“हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सुरु असताना दिग्दर्शक वेगळ्याच पद्धतीने बोलतात, तर त्यांचे असिस्टंट काही वेगळंच चित्र तयार करत असतात आणि या गोंधळामध्ये कलाकार अगदी एकटा उभा असतो. रंगभुमीवरील एखादा कलाकार ज्याचं इंग्रजी भाषेवर फारसं प्रभुत्व नाही त्याला सेटवर दिग्दर्शक काय बोलत आहे हे काहीच कळत नाही.” असंही तो म्हणाला.

Sumitra nalawade: