‘मी पोहोचलो रे हिमालयात…’; कोल्हापूर पोटनिवडणूक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलं चंद्रकांत पाटलांचं मीम

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. भाजपानं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या पाठिशी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद उभी राहिल्यामुळे दोघांमध्ये कांटे की टक्कर होणार असल्याचं भाकित वर्तवलं जात होतं. पण प्रत्यक्षात जयश्री जाधव यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा दणदणीत पराभव केला आहे. या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर मीम पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकून होते. दोनच दिवसांपूर्वी इथल्या मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला. दादा हिमालयात जावा अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तिथून काढता पाय घेतला होता.

याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी खोचक मीम ट्वीट करत चंद्रकांत पाटील आणि भाजपावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आधी निकालाबाबतचं ट्वीट केलं. यामध्ये “फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा विजय… कोल्हापूरची जागा जिंकली… शाहू महाराज की जय”, असं ट्वीट केलं आहे. तसंच पुढच्या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एक मीम शेअर केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलेल्या मीममध्ये चंद्रकांत पाटील मांडी घालून आणि डोळे मिटून बसल्याचं दिसत आहे. तो फोटो मॉर्फ्ड करून त्याच्या पार्श्वभूमीवर हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. सोबत बॉक्समध्ये ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं वाक्य लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी “नको, परत या”, अशी खोचक टिप्पणी देखील केली आहे.

Sumitra nalawade: