‘…साहेबांसमोर सांगतो, मला विक्रम काळेंचा कार्यक्रम घेताना मनात भितीच असते’- अजित पवार

औरंगाबाद : राज्याचे उपमुख्यमंत्री आजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांची भीतीच वाटत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी विक्रम काळे यांनी भाजपाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचं उदाहरण दिल्याचंही नमूद केलं आहे. अजित पवार मंगळवारी औरंगाबादमध्ये बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, “साहेबांसमोर सांगतो, मला विक्रम काळे यांचा कार्यक्रम घेताना मनात भीतीच असते. कारण कार्यक्रमाला बोलावून ते भर कार्यक्रमात काय मागेल याचा कोणी अंदाजच बांधू शकत नाही. मी खोटं नाही सांगत, त्यांनी मागच्या वर्षी माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेला बोलावलं. तिच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. कार्यक्रम सतीश चव्हाण यांच्या सत्काराचा होता. त्या कार्यक्रमात मी तीन टर्म आमदार म्हणून निवडून आलोय. मला मंत्री करा थेट अशीच मागणी करून टाकली.”

“यावर विक्रम काळे म्हणाले, भाजपात आमदार चंद्रकांत पाटील पहिल्या टर्ममध्ये मंत्री होतात आणि मला तीन टर्मला मंत्री करत नाहीत. उदाहरण पण चंद्रकांत पाटलांचं दिलं. सतीश चव्हाण म्हणाले कार्यक्रम माझा होता, माझं दिलं सोडून विक्रम स्वतःच मागत बसला. हे असला विक्रम आहे. त्यामुळे मी इतकं दबकत दबकत आलो की काही न सांगितलेलं बरं,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.

“विक्रम काळे यांना नंतर लक्षात आलं की सतीश चव्हाण पण शेजारी बसलेत, तेव्हा मंत्रिपद एकट्यासाठी मागणं बरं दिसणार नाही, त्यांना काय वाटेल. म्हणून मग सतीश चव्हाण वरिष्ठ आहेत, त्यांनाही मंत्री करा अशी मागणी केली. एकालाच मंत्री करायचं ठरलं तर सतीश चव्हाण यांचा नंबर लागेल. त्यामुळे त्यांनी दोघांनाही मंत्री करा असं सांगून टाकलं. कारण एकाला म्हटलं असं तर विक्रम काळेंचा नंबर कटला असता. अशा पद्धतीचा हा आमचा विक्रम काळे आहे,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: