मुंबई | ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली आहे. तसंच या चित्रपटामधील आणखी एक अभिनेता चर्चेत राहिला तो म्हणजे क्षितिश दाते. क्षितीशने या चित्रपटामध्ये राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान, श्रेयर्स रेकॉर्डस या युट्यूब चॅनलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये क्षितीशने चित्रपटादरम्यानचे काही किस्से सांगितले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता क्षितीश म्हणाला, “एकनाथ शिंदे सरांच्या घरी आम्ही एक सीन शूट केला. अर्थात त्यांचं घरामध्ये एक ऑफिस आहे. शिवाय घरी लोकांची वर्दळ असते. माझा सेटवरच मेकअप केला आणि इनोव्हामधून त्यांच्या घरी नेलं. खरंच मी थट्टा करत नाही. पण सेटपासून त्यांच्या घरी जाईपर्यंत ठाण्यामध्ये काही ठिकाणी वाहतूक कोंडी होती. यादरम्यान लोकांनी मला एकनाथ शिंदे यांच्या लूकमध्ये गाडीच्या काचेमधून पाहिलं. माझी प्रतिमा धूसर दिसत होती. लोक मला एकनाथ शिंदे आहेत हे समजून अक्षरशः हात जोडून नमस्कार करत होते. यामधूनच एकनाश शिंदे यांची पावर काय आहे ते समजलं.”
तसंच क्षितिशने या भूमिकेसाठी एकनाथ शिंदे यांची अनेक भाषणं ऐकली. ही भूमिका साकारणं क्षितीशसाठी काही सोपं नव्हतं. राजकीय क्षेत्रातील मोठं नाव आणि त्यातही त्यांचं काम पाहता क्षितीशला बरंच दडपण आलं होतं. पण चित्रपटासाठी त्याला एकनाथ शिंदे यांची उत्तम साथ मिळाली.