मुंबई : नुकताच राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये भाजपने बाजी मारली असून महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज अहमदनगर मधील एका कार्यक्रमात भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठ विधान केलं आहे. तसचं विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.
सुजय विखे पाटील म्हणाले, काहीही झालं तरी मी शिवसेनेची साथ सोडणार नाही. मी भाजपचा खासदार म्हणून निवडून येण्यासाठी इथल्या शिवसेनेचा 50% वाट आहे. मी याआधी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कधी बोललो नाही आणि बोलणार नाही. आता राज्यसभेच्या निवडणुकीत सर्वाना अनुभव आला असेलच, राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे तरी मुख्यमंत्र्यांनी सावध राहवं असा सल्ला देखील त्यांनी कार्यक्रमादरम्यान दिला आहे.
दरम्यान, विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की, मी नगरमधील शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही. यामुळे पंतप्रधान मोदींनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. हे विधान करणारा मी एकमेव खासदार असेल. असं विखे पाटील म्हणाले. तसंच मी हे बोलतोय कारण इथलं राजकारण मी ओळखतो. नगर मध्ये जे शिवसेनेने काम केलं आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठींबा असेल असं देखील त्यांनी सांगितलं आहे.