अमरावती | Bacchu Kadu – गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आज (13 जुलै) सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचे गुलाम बनून राहू असं वक्तव्य केलं.
यावेळी बच्चू कडू म्हणाले की, अनेकदा आम्हाला अनेकांनी वेगवेगळी आमिषं दाखवली. तरी देखील आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरेंनी आम्हाला मंत्रीपद दिलं, आम्ही त्यांच्यासाठी योगदान दिलं. पण उद्धव ठाकरेंनी दिलेला पाठिंबा मागे घेण्यासाठी आम्हाला करोडो रूपयांची ऑफर दुसरा पक्ष द्यायला तयार होता. पण आम्ही ती ऑफर नाकारली. जर उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं असतं तर गुवाहाटीला जाण्याची वेळ आली नसती, असा टोलाही कडू यांनी लगावला.
आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय दिलं. त्यामुळे आम्ही त्यांचे आयुष्यभर गुलाम बनून राहू. तसंच आम्ही मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण आता मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटून 18 तारखेला आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार आहे, असंही बच्चू कडूंनी सांगितलं.