भोपाळ | Shivraj Singh Chauhan : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) मुख्यमंत्रीपदी मोहन यादव (Mohan Yadav) यांची निवड झाली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना मोठा धक्का बसला आहे. तर आज शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकार परिषद घेत मोठं वक्तव्य केलं आहे. मी स्वत:साठी काही मागण्यापेक्षा मरण पसंत करेन, असं वक्तव्य शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे.
छिंदवाडामधून तुम्ही निवडणूक लढणार का? असा प्रश्न शिवराज सिंह चौहान यांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, मी स्वत:च्या बाबतीत कोणताही निर्णय घेत नाही. तर पुढे शिवराज सिंह चौहान यांनी नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांना शुभेच्छा दिल्या.
मध्य प्रदेश मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि प्रगतीची नवीन उंची गाठेल. त्यामुळे आज माझ्या मनात समाधानाची भावना आहे, असं शिवराज म्हणाले. तसंच मी मुख्यमंत्रीपदावर असताना माझं जनतेसोबत प्रेमाचं नातं होतं. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी हे नातं तुटू देणार नाही, असंही शिवराज म्हणाले.
पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी मला काम करण्याची आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.