सेमी फायनलचे तीन संघ निश्चित, चौथ्या स्थानासाठी या संघांमध्ये चुरस, पाहा

ICC World Cup 2023 Semifinal teams : टीम इंडिया सध्या वर्ल्ड कप २०२३ च्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारत उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सोबतच आफ्रिका आणि न्यूझीलंड हेही सेमी फायनलचे प्रबळ दावेदार आहे. तर सेमी फायनलचा चौथा संघ कोणता असेल, यासाठी चुरस रंगणार आहे.

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ८ संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ५ सामने खेळले आहे. या संघांमध्ये टीम इंडियाने सर्वात चांगली कामगिरी केली आहे. भारताने सर्वच्या सर्व ५ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. वर्ल्डकपच्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर उपांत्य फेरीतील स्थिती जवळपास स्पष्ट आहे. भारताचे सर्वाधिक गुण आहेत. यामुळे भारताचे उपांत्य फेरीचे तिकिट जवळपास निश्चित झाले आहे. तर भारताबरोबरच आणखी दोन संघ उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार आहेत. पण सेमी फायलनध्ये जाणारा चौथा संघ कोणता असेल याबाबत अद्याप सस्पेंस आहे.

भारताबरोबरच दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. भारताने ५ सामने खेळले असून सर्व जिंकले आहेत. भारताचे १० गुण आहेत. टीम इंडियाचा नेट रन रेट +१.३५३ आहे. तर दक्षिण आफ्रिकेने ५ सामने खेळले असून ४ जिंकले आहेत. त्यांचे ८ गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट +२.३७० आहे. आफ्रिकेचा नेट रनरेट सर्वांपेक्षा चांगला आहे. न्यूझीलंडचेही ८ गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी आहे. याच कारणामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हे तिन्ही संघ उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार आहेत.

तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ५ सामने खेळले असून ३ जिंकले आहेत. त्यांचे ६ गुण आहेत. ऑस्ट्रेलियन संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी ४ गुण आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामने खेळले असून प्रत्येकी २ सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरीसाठी या तिघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. याशिवाय श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश आणि नेदरलँडचे प्रत्येकी २ गुण आहेत. श्रीलंका आणि इंग्लंड यांनी आतापर्यंत प्रत्येकी ४ सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा पुढचा सामना इंग्लंडविरुद्ध आहे. यानंतर टीम इंडिया श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडला भिडणार आहे.

Prakash Harale: