पुणे – ICSE RESULT DECLAIRES : शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात कायमच देशात पुण्याचं नाव शीर्षस्थानी नेण्याचा प्रयत्न करतात. आता पुन्हा एकदा पुणेकरांसाठी अभिमानाची बातमी आहे. रविवारी (१७ जुलै) कौन्सिल फॉर द स्कुल सर्टिफिकेट एक्सामिनेशनच्या (आयसीएसई) दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल ९९.९७ टक्के लागला असून मागील वर्षी ९९.९८ टक्के निकाल लागला होता. यात पुण्यातील विद्यार्थिनीने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.
आज जाहीर झालेल्या निकालात पुण्यातील सेंट मेरी स्कूलच्या हरगुन कौर माथारू या विद्यार्थिनीने ९९.८0 टक्के गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळं तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. त्याचबरोबर कानपूर मधील शेलिंग हाऊस स्कुलच्या अनिका गुप्ता हिने देशात दुसरा क्रमांक तर बलरामपुरच्या जीसस एंड मेरी स्कुलच्या पुष्कर त्रिपाठी याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेत देशभरात एकूण २ लाख ३१ हजार ६३ विद्यार्थी बसले होते. त्यांत मुलींनी चांगली बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.९८ टक्के तर मुलांची ९९.९७ टक्के एवढी आहे. यात महाराष्ट्राचा निकाल १०० टक्के लागला आहे.