मुंबई : रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कोणतीही तिसरी किंवा चौथी आघाडी देशातल्या निवडणुका जिंकू शकत नाही, असं विधान केलं आहे. ते लवकरच काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा मधल्या काही काळात सुरू होत्या. मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे.
२०२४ च्या निवडणुकांदरम्यान तिसरी आघाडी म्हणून पुढं येण्यासाठी तुम्ही ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची मदत करत आहात का, याबद्दल माध्यमांनी विचारलं असता प्रशांत किशोर म्हणाले, मला असं कधीच वाटत नाही की तिसरी किंवा चौथी आघाडी या देशात निवडणुका जिंकू शकेल. समजा भाजपा ही पहिली आघाडी आहे. तर तिला हरवण्यासाठी या देशामध्ये दुसरी आघाडी असणं गरजेचं आहे. जर एखाद्या पक्षाला भाजपाला हरवायचं असेल, तर त्याला दुसरी आघाडी म्हणून उदयाला येणं गरजेचं आहे.