‘हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर…’; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : आज (सोमवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, राज्य सरकारकडून आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपाने बहिष्कार का टाकला, यांचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, “आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. परंतु ज्या काही घटना मागील चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय असं आम्हाला वाटत नाही. जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशाप्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.”

“मुळातच विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायचं अशाप्रकारची प्रवृत्ती जर सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जीवे मारण्यासाठी पोलिसांच्या समक्ष हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही त्यासंदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर मग अशा परिस्थितीत अशा बैठकीत जाऊन फायदा काय?” असं देखील फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात अशी परिस्थिती आम्ही कधीच बघितील नाही की सरकार पक्षाचे लोक, पोलीस संरक्षणात विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करत आहेत. आम्ही पोलखोल यात्रा काढली, या यात्रेच्या माध्यामातून मुंबई महापालिकेतील सगळा भ्रष्टाचार हा आम्ही जनतेसमोर मांडला. लोकशाहीत यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? पण ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला. आमच्या पोलखोल रथावर हल्ला केला आणि त्यांना असं वाटतय, की अशाप्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं बंद करू, हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई सुरूच राहील.”

Sumitra nalawade: