मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन केलं आहे असं म्हटलं आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारच्या आदेशाचे पालन महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे. मला असं वाटतं की, महाराष्ट्र सरकार नेहमी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करते.”
“भोंग्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्यातील सर्व राजकीय पक्षांना सरकारनं चर्चेसाठी बोलवलं होतं. महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांना सरकारनं बोलावलं होतं. सर्व मिळून निर्णय घेऊ असं सांगण्यात आलेलं. मात्र या बैठकीवर भाजपाने बहिष्कार टाकला,” असंही संजय राऊत म्हणाले.