मतभेद कोणाचे अन् फायदा कोणाचा होतोय..
उद्धव ठाकरे गट व शिंदे गटात झालेल्या भांडणाची व एकूणच सेना भाजपच्या भांडणाची सर्वात अधिक मजा राष्ट्रवादीने उचलली आणि उद्धव ठाकरेंना ब्रिगेडी लोकांच्या सोबत तर बसवलं उलट सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीने सेनेला दिले.
ठाकरे गट एकाकी पडण्याची राज्यात दाट शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीने त्यांची ताकद असलेल्या मतदारसंघात व्यक्तिगत निवडून येण्याची जय्यत तयारी सुरू केलेली आहे. याउलट ठाकरे गटाचा नाव व चिन्ह व गद्दार म्हणून नाव ठेवणं यातच वेळ गेलाय. शिंदे यांच्यासोबत भाजप असल्याने व ते सत्तेत असल्याने शिवसेना भाजपचे आमदार त्यांच्या मतदारसंघात जोरदार तयारी करत आहेत. विकसकामे करत आहेत. याउलट उध्दवजींची सेना विविध मेळावे घेत सुटली आहे. त्याने त्यांचे नाही तर राष्ट्रवादीचेच फावते आहे. अनेक शिवसैनिक सोशल नेटवर्कवर एकमेकांना शिव्या देत असले तरी ज्या मतदारसंघात उठाव करणारे सेनेचे आमदार आहेत त्या ठिकाणी हे सैनिक त्या आमदाराची योग्य रिलेशन ठेवून आहेत. कारण बाळासाहेबांच्या शिवसेनेची कमर्शियल काँग्रेस स्वतः उद्धवजीनी केली आहे. ज्यावेळी महाविकास आघाडीचा निवडणूक विषय येईल, त्यावेळी हे सैनिक राष्ट्रवादीचे काम करतीलच, अशी खात्री देता येत नाही. तसेच राष्ट्रवादीचे लोक एकदिलाने ठाकरे गटाचे काम करण्याची शक्यता कमी आहे. कारण तेल पाणी एकत्र होऊन इंजिन धावू शकत नाही.
शिंदे यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे मॉडेल राज्यात कार्यरत आहे, त्याच पद्धतीने स्वतःचे आधुनिक मॉडेल उभं केलं आहे. ज्यामध्ये आमदारांना त्यांच्या मतदारसंघात पक्ष बांधणीचे व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. पूर्वी ठाकरे घराणे प्रत्येक मतदारसंघात 3-4 वेगवेगळे गट तयार ठेवत आणि हे सर्व गट सोडून गेले तरी त्यांच्याकडे कायमस्वरूपी शिवसैनिक नावाची शिदोरी असे. शिंदेंनी या शिदोरीला छेद दिला आहे. आता शिंदेंसोबतचे आमदार या सर्व घटकांना चेपतील व ते ठाकरे गटाकडे स्वायत्ततेने जाणं कठीण आहे. शिंदे गटाच्या आमदारांना निवडून आणण्याचे महत्त्वाचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी, ठाकरे गटाचा फायदा करून घेणार, असे दिसत आहे. उद्धव ठाकरे गट व शिंदे गटात झालेल्या भांडणाची व एकूणच सेना भाजपच्या भांडणाची सर्वात अधिक मजा राष्ट्रवादीने उचलली आणि उद्धव ठाकरेंना ब्रिगेडी लोकांच्या सोबत तर बसवलं उलट सुषमा अंधारेना राष्ट्रवादीने सेनेला दिले. सध्याच्या राजकीय स्थितीत उद्धव ठाकरे यांना पवार सांगतील ते करावं लागेल, अशी स्थिती राष्ट्रवादीने तयार केलीये. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा आहे, असं सांगून स्वतःला पद घेतलं आणि भाजपला फसवून आज बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची संघटना अशा व्यक्तीसोबत नेऊन जोडली आहे ज्यांच्याशी स्थानिक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष केलाय. अशी अवस्था शिवकाळात औरंगजेबाकडे व आदिलशाहीकडे असणाऱ्या सरदारांची राज्यात झाली होती.
अशी राजकीय परिस्थिती राज्यात विशेष कोणत्या नेत्याची आलेली नव्हती. शरद पवारांनी अशी परिस्थिती काँग्रेससमोर अनेकदा करून ठेवली आहे. याचा इतिहास उद्धव ठाकरेंना माहीत नसावा. म्हणूनच कॉंग्रेस पवारांच्या सोबत असली तरी ती स्वतःचे वेगळे अस्तित्व ठेवते. शिवसेनेला मनापासून काँग्रेसने देखील स्वीकारले नाही. त्यामुळं सेनेने सध्या राष्ट्रीय राजकारण सोडून दिलेले दिसते. यामुळे एकूणच काय झालं काय? तर शिवसेनेचे दोन पक्ष तयार झाले आणि जनतेनी नाकारलेल्या राष्ट्रवादीला राज्यात अच्छे दिन आले. मी मुख्यमंत्री झालो नसतो तर असा निबंध उद्धव ठाकरे लिहायला बसले तर त्यांना अनेकविध मुद्द्यांचा उलगडा होईल. पण त्या चुका मान्य करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे नाही.
-विनोद देशमुख (ज्येष्ठ पत्रकार)