मुंबई | Nana Patole – काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) मोठं वक्तव्य केलं होतं. राज्यात मोठ्या घडामोडी सुरू असताना 2024 मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आत्ताच कसं सांगू? असं शरद पवार म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) महाविकास आघाडीबाबत सूचक विधान केलं आहे.
नाना पटोले म्हणाले की, “महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा मानस आहे. पण जर आघाडी झाली नाही तर आमचे पुढचे प्लॅन तयार आहेत.” नाना पटोलेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागलेले दिसत आहेत. यावरूनही नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री कोण होणार याबाबत जनता ठरवते. त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. सध्या जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तसंच आज निवडणुका नाहीत त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल”, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.