‘तुमच्या भानगडी मी बाहेर काढीन…’; नारायण राणेंचा संजय राऊतांना इशारा

narayan rane and sanjay raut 1narayan rane and sanjay raut 1

मुंबई : राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले. त्यानंतर मुंबईतील खार त्यांच्या येथील निवासस्थानी शिवसैनिकांनी घेराव घातला होता. त्यानंतर राणा दांपत्याने आपण आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतरही जोपर्यंत राणा दांपत्य माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर पडू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. या वादात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली असून त्यांनी शिवसेना आव्हान दिलं आहे. सोबतच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राणांवर टीका केली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर देखील निशाणा साधला आहे.

“संजय राऊत शिवसेना तुमच्या मागे का येईल? राज्यसभेत खासदार म्हणून जात असताना मतदार यादीत संजय राऊतांचे नाव होते का असा प्रश्न त्यांना विचारा. असेल तर त्यांना दाखवायला सांगा. त्यावेळी मी त्यांच्या बरोबर होतो. तुम्ही फसवणूक केल्याचा मी साक्षीदार आहे. तुमच्या भानगडी मी बाहेर काढीन. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन मी तुम्हाला खासदार बनवले. मी त्यांना सोबत घेऊन गेलो आणि फॉर्म भरला. आक्षेप घेतल्यानंतर मी सांभाळून घेतले. तेव्हा ते खासदार झाले. तुम्हीसुद्धा फॉर्म भरताना खोटी कागदपत्रे सादर केलीत,” असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

पुढे नारायण राणे म्हणाले, “थोड्या दिवसाने ईडी संजय राऊतांच्या तोंडात विडी देणार आहे. अमरावती आमचा गड आहे असे राऊत म्हणतात. मग तिथे तुमचा खासदार का पडला? हे असेच चालू राहिले तर शिवसेनेचे १० – १५ आमदारही निवडून येणार नाहीत.”

“अनिल परब, विनायक राऊत, सुभाष देसाई ही चार पाच डोकीच दिसतात. सत्तेत शिवसैनिक दिसत नव्हता. मातोश्रीवर दगड पडल्यानंतर एवढे करुन दोन दिवसात २३५ शिवसैनिक जमले. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची काय अवस्था करुन टाकली आहे. बाळासाहेबांचा हात वर आला की लाखो लोक जमायचे. आता कोण येत नाही. आम्ही जीवाची पर्वा करत नाही अशा किशोरी पेडणेकर म्हणतात. तुमचे कोणी गेले आहे का छातीवर मारुन घ्यायला. मातोश्रीच्या रक्षणासाठी पोलीस कमी पडतात म्हणून हे लोक जमवून ठेवले आहेत,” असं देखाल राणे म्हणाले.

“सत्ता असतानाही ते आव्हान देत आहेत, संजय राऊत तर स्मशानात बाकी व्यवस्था करून ठेवा, जर आम्हाला काही धमक्या द्याल तर असं म्हणत आहेत. परबांनी सांगितलं की जोपर्यंत माफी मागत नाही, तोपपर्यंत राणा कुटुंबीयांना आम्ही जाऊ देणार नाही. हे सर्व पाहात असताना राज्यात पोलीस व्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आहे. तुम्ही असं केलं तर स्मशानात पाठवू, हा गुन्हा होत नाही का? घरातून बाहेर पडू देणार नाही असं म्हणणं हा गुन्हा नाही का?” असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

Sumitra nalawade:
whatsapp
line