पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘लाऊड अॅप्लॉज’ या डान्स मॅगझीनने तरुण कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी ‘लाऊड अॅप्लॉज डान्स फेस्टिव्हल’चे आयोजन केले होते. नृत्यगुरू स्वाती दैठणकर, नृत्यांगना शर्वरी जेमनीस, नेहा मुथियान, डॉ. परिमल फडके यांच्या उपस्थितीत झालेल्या या डान्स फेस्टिव्हलला चांगला प्रतिसाद मिळाला.
नृत्यांगना शर्वरी जेमनीस, नृत्यगुरु स्वाती दैठणकर, प्रा. नंदकुमार काकिर्डे, नेहा मुथियान यांनी दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मान्यवरांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा प्रशस्तिपत्रक आणि ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला. ‘लाऊड अॅप्लॉज’ या डान्स मॅगझीनच्या संपादक आणि ‘कथक पाठशाला’च्या संस्थापक नेहा मुथियान यांच्या संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लाऊड अॅप्लॉज डान्स फेस्टिव्हल’मध्ये कथक आणि भरतनाट्यम् या नृत्यप्रकारांचे बहारदार सादरीकरण झाले.