येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण नऊ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी ३८ मतदारसंघांत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघांतील महिलांचा कल महत्त्वाचा ठरणार आहे.
महिलांची संख्या सर्वाधिक असलेल्या मतदारसंघामध्ये शहादा, नंदुरबार, अकोला पश्चिम, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, तिरोडा, भंडारा, गोंदिया, साकोली, आमगाव, अर्जुनी मोरगाव, अरमोडी, डहाणू, ब्रह्मपुरी, पालघर, माहीम, कर्जत, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, कसबा पेठ, शिरोळ, कोल्हापूर उत्तर, कागल, चंदगड, सोलापूर शहर उत्तर, दापोली, रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी, राजापूर, कणकवली, कुडाळ, मिरज आणि पलूस कडेगाव यांचा समावेश आहे.
राज्यात १८ ते १९ वयोगटातील २२ लाख २२ हजार मतदार
१८ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ मतदारांमध्ये पुरुष मतदार १२ लाख ९१ हजार ८४७ , ९ लाख ३० हजार ७०४ महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 153 इतकी आहे. २० ते २९ या वयोगटातील एकूण १ कोटी ८८ लाख ४५ हजार ००५ तर ३० ते ३९ या वयोगटातील एकूण २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ मतदार आहेत. ४० ते ४९ या वयोगटात २कोटी ७ लाख ३० हजार ५९८ तर ५० ते ५९ या वयोगटात १ कोटी ५६ लाख १० हजार ७९४ मतदारांची संख्या आहे. ६० ते ६९ या वयोगटातील एकूण ९९ लाख १८ हजार ५२० मतदार तर ७० ते ७९ या वयोगटातील एकूण ५३ लाख ५२ हजार ८३२ मतदार आहेत. ८० ते ८९ या वयोगटात एकूण २० लाख ३३ हजार ९५८ तर ९० ते ९९ या वयोगटात एकूण 4 लाख ४८ हजार ३८ मतदार आहेत.
शंभरी पार केलेले ४७,३९२ मतदार
राज्यात वयाची शंभरी पार केलेल्या ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार २१ हजार ८९ , महिला मतदार २६ हजार २९८ तर तृतीयपंथी मतदार २ इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे.
* पुण्यात सर्वाधिक तर सिंधुदुर्गात सर्वात कमी मतदार
राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिह्यात आहेत. पुणे जिह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरुष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिह्यात आहे. सिंधुदुर्ग जिह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरुष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ३ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे.